सचिन लाड - सांगली -त्याचे नाव महम्मद जमाल नदाफ. अकरा वर्षापूर्वी खुनाच्या गुन्ह्यात पोलिसांच्या रेकॉर्डवर आलेला हा तरुण. त्यावेळी त्याला मिसरूडही फुटले नव्हते. पण त्याच्या करामतीने संजयनगर हादरुन गेले होते. खुनातून निर्दोष सुटल्यानंतर महम्मदचा ‘महम्मदभाई’ झाला आणि पुढे गुन्ह्यांची मालिका रचणारा महम्मद पोलिसांच्या रेकॉर्डवर मात्र आला ‘म्हमद्या’ म्हणून! तीन खून, खुनाचा प्रयत्न असे डझनावर गुन्हे नोंद असणाऱ्या म्हमद्याने सांगली पोलिसांना नेहमीच आव्हान दिले आहे. सहा वर्षांपूर्वीही त्याने दुर्गेश पवार याच्यावर हल्ला करून पोलिसांना गुंगारा दिला होता.सांगलीतील संजयनगर या उपनगरात राहणाऱ्या म्हमद्याची गेल्या दहा वर्षात सातत्याने ‘तुरुंगवारी’ सुरू राहिली आहे. अगदी पोलिसांची कॉलर पकडण्यापर्यंत त्याची मजल गेली. रॉकेल तस्कर सुभाष पुजारी याचा शिंदे मळ्यातील रेल्वे ब्रीजखाली खून केल्यानंतर, म्हमद्याचा गुन्हेगारी प्रवास सुरू झाला. म्हमद्या कोण हे सांगलीकरांना माहीतही नव्हते. त्यावेळी त्याला मिसरूडही फुटले नव्हते. पण या खुनातून तो निर्दोष सुटला. एक खून पचनी पडल्याने म्हमद्याची किरकोळ दादागिरी सुरू झाली. चार-पाच पोरे त्याच्या अवतीभवती फिरू लागली. नशेच्या गोळ्या आणि दारू हे त्याचे व्यसन. नशेत काहीही करायला तो मागे-पुढे पाहत नाही, असे खुद्द पोलीस सांगतात. संजयनगरमधीलच गुंड मध्या वाघमोडे हा त्याचा कट्टर प्रतिस्पर्धी. चैनीसाठी हातात तलवारी घेऊन धमकावून खंडणी वसूल करणे, हा म्हमद्याचा धंदाच बनला होता. सणासुदीच्या काळात त्याला पकडायला गेले की, त्याच्याकडे पिस्तूल, तलवार, कोयता ही घातक शस्त्रे नेहमीच सापडली आहेत. वडर कॉलनीतील दुर्गेश पवार याच्यावर दसरा चौकात थरारक पाठलाग करून त्याने खुनीहल्ला केला होता. या गुन्ह्यात त्याला जामीन न झाल्याने तो पाच वर्षे कारागृहात राहिला. या काळात त्याच्या पुढाकाराने विजय पवार या गुंडाच्या खुनाचा कट रचण्यात आला. पवार पंचमुखी मारुती रस्त्यावर झालेल्या दुहेरी खुनातील आरोपी होता. त्यात त्याला जन्मठेपेची शिक्षा झाली होती. शिक्षा भोगत असताना तो पॅरोल रजेवर बाहेर आल्यानंतर त्याची ‘गेम’ झाली. याप्रकरणी कारागृहात असतानाही म्हमद्यावर खुनाचा गुन्हा नोंद झाला होता. आर्थिक पाठबळ अन् राजकीय आश्रय आर्थिक पाठबळ आणि राजकीय आश्रय लाभल्याने म्हमद्याने गेल्या अकरा वर्षात कायदा व पोलिसांना जुमानले नाही. चार-पाच लोक अंगावर आले तरी अगदी सहजपणे प्रतिकार करू शकेल, एवढी त्याच्यात धमक असल्याचे पोलीसच सांगतात. दुर्गेश पवार याच्यावरील हल्ल्यात त्याला शिक्षा झाली आहे. अन्य १७ गुन्ह्यांचे काय झाले, याबद्दल पोलीसही स्पष्टपणे सांगू शकत नाहीत. तत्कालीन जिल्हा पोलीसप्रमुख दिलीप सावंत यांनी त्याला सळो की पळो करून सोडले होते. दुर्गेशवर हल्ला केल्यानंतर तो तीन महिने गुंगारा देत फरारी होता. आताही तशीच स्थिती निर्माण झाली आहे.
गुंड म्हमद्या नदाफचे पोलिसांना पुन्हा आव्हान!
By admin | Published: November 13, 2015 11:12 PM