सांगली - राज्यातील 105 नगरपंचायतींच्या निवडणुकांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस हा सर्वाधिक नगरपंचायती जिंकणारा पक्ष ठरला आहे. मात्र, सर्वाधिक नगरसेवक जिंकण्यात भाजपला यश आलंय. तर, काँग्रेसने मिळालेल्या जागांवर समाधान व्यक्त केलंय. राज्याच्या सांगली जिल्ह्यातील कवठेमहांकाळ नगरपंचायतीवर रोहित पाटील यांच्या नेतृत्वात राष्ट्रवादीने सत्ता स्थापन केलीय. तर, दुसरीकडे भाजप नेते गोपीचंद पडळकर यांच्या खानापूर नगरपंचायतीवर भाजपला भोपळाही फोडता आला नाही.
सांगली जिल्ह्यात रोहित पाटलांमुळे कवठेमहांकाळ नगरपंचायत निवडणूक राज्यात लक्षवेधी ठरली होती. तर, दुसरीकडे भाजपचे आमदार आणि सातत्याने राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार आणि अजित पवार यांच्यावर टीका करुन आपले लक्ष वेधणारे गोपीचंद पडळकर यांच्या गावच्याही निवडणुकीकडे अनेकांचे लक्ष होते. मात्र, पडळकर यांच्या खानापूर नगरपंचायतीत भाजपला एकही उमेदवार निवडून आणता आला नाही. त्यामुळे, बड्या बड्या बाता आणि निवडणुकीत पराभवतच पत्करता... अशीच अवस्था गोपीचंद पडळकर यांची झाली आहे.
येथील निवडणुकीत शिवसेना-काँग्रेसला 9 तर विरोधातील राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) प्रणित जनता आघाडीला 7 जागा मिळाल्या असून, त्यांचा एक समर्थक अपक्ष निवडून आला. भाजपला या निवडणुकीत भोपळाही फोडता आला नाही. खानापूर (Khanapur) ग्रामपंचायतीची नगरपालिका झाल्यानंतर ही दुसरी निवडणूक झाली. निवडणुकीत सत्ताधारी काँग्रेस-शिवसेना महाआघाडीचं नेतृत्व आमदार अनिल बाबर, सुहास शिंदे, पांडुरंग डोंगरे यांनी केले. त्यांनी 17 पैकी 9 जागा जिंकून काठावरील बहुमत मिळावले आहे. तर, विरोधी राष्ट्रवादी पुरस्कृत राजेंद्र माने, सचिन शिंदे, राजाभाऊ शिंदे यांची जनता आघाडी होती. भाजपनेही या निवडणुकीत लढत दिली, गोपीचंद पडळकर यांच्यावर येथील जबाबदारी होती. मात्र, भाजपची घोर निराशाच झाली.