वाळवा : थोर स्वातंत्र्यसेनानी, सातारा प्रती सरकारचे आधारस्तंभ क्रांतिवीर डॉ. नागनाथआण्णा नायकवडी यांच्या ९९ व्या जयंतीचे सर्व कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत, अशी माहिती स्मारक समिती अध्यक्ष वैभव नायकवडी यांनी पत्रकार परिषदेत दिली.
ते म्हणाले, डॉ. नागनाथआण्णांची १५ जुलै रोजी ९९ वी जयंती साजरी केली जात आहे. यंदा त्यांच्या शतकमहोत्सवी जयंती वर्षाचा आरंभ होतो आहे. यानिमित्ताने हुतात्मा शिक्षण व उद्योग समूहाच्या वतीने वर्षभर विविध कार्यक्रम राबविण्यात येणार आहेत; परंतु महाराष्ट्रातील वाढत्या कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर, तसेच मुख्यमंत्री व जिल्हाधिकाऱ्यांनी जाहीर केलेल्या आवाहनानुसार नियोजित सर्व कार्यक्रम रद्द केले आहेत.
ते म्हणाले, त्याचप्रमाणे १७ जुलै रोजी हुतात्मा शिक्षण व उद्योग समूहाच्या वतीने आयोजित संकुलाच्या प्रमुख मार्गदर्शिका कुसुमताई नायकवडी यांच्या दुसऱ्या स्मृतिदिनाचे कार्यक्रमही रद्द करण्यात आले आहेत; परंतु दोन्ही कार्यक्रम दिवशी प्रत्येक व्यक्तीला स्मारकस्थळी योग्य अंतर ठेवून, मास्क व सॅनिटायझरचा वापर करून पुष्पांजली वाहून अभिवादन करण्यासाठी परवानगी दिली आहे.