अविनाश बाड ।आटपाडी : गेली २७ वर्षे आटपाडीत पाणी संघर्ष परिषद होत आहे. तिसरी पिढी चळवळीत सहभागी झाली तरीही, आताच्या चौथ्या पिढीला चळवळीत सामील होण्याचे आवाहन केले जात आहे. तेलंगणा सरकारने तीन वर्षात जगातील सर्वात मोठी उपसा सिंचन योजना पूर्ण केली. पण २७ व्या पाणी परिषदेत दुष्काळग्रस्तांनो एकत्र या, असे आवाहन वारंवार केले गेले. त्यामुळे नागनाथअण्णा, दुष्काळी भागातील शेतीला पाणी देण्याचे तुमचे स्वप्न कधी साकार होणार, असा प्रश्न दुष्काळग्रस्तांना पडला आहे.
या दुष्काळग्रस्त भागात येऊन क्रांतिसिंह नागनाथअण्णा नायकवडी या थोर स्वातंत्र्यसैनिकाने हाक दिली. ११ जुलै १९९३ रोजी आटपाडीत त्यांच्या नेतृत्वाखाली पहिली पाणी परिषद घेतली. खूप मोठ्या संख्येने लोक भवानी हायस्कूलच्या पटांगणात जमा झाले. चक्का जाम, मानवी साखळी, शेतसारा बंदी अशी अनेक अभिनव आंदोलने करण्यात आली. तत्कालीन शासनात असलेले आर. आर. पाटील, पतंगराव कदम, रामराजे नाईक-निंबाळकर, गणपतराव देशमुख मंत्रिपदी असताना परिषदेस हजर राहिले.२००० मध्येच लवादाच्या कराराची मुदत संपणार असल्याने, त्याआधी योजना पूर्ण करण्यासाठी रेटा लावला पाहिजे, या भूमिकेने दुष्काळग्रस्तांनी भवानी हायस्कूलचे पटांगण खचाखच भरून जात होते.
तेव्हा मंडपही दिला जात नव्हता आणि नागनाथअण्णा शासकीय विश्रामगृहासमोरील तंबूत मुक्काम ठोकायचे. हे सगळे आठवण्याचे कारण, बुधवारी झालेली पाणी परिषद. आता पहिल्याएवढे उंच व्यासपीठही बांधले जात नाही. केवळ मंडप होता, तरीही मंडपातील जागा रिकामी होती. पूर्वी तावातावाने बोलणारे वक्ते आता वयोमानपरत्वे धीराने-दमाने बोलत होते. दुष्काळग्रस्तांना पाणी देण्यासाठी एकत्रित आलेल्या काही नेत्यांनी वेगळी चूल मांडली आहे.या परिषदेत आ. गणपतराव देशमुख, वैभव नायकवडी आणि राजेंद्रअण्णा देशमुख यांच्या भाषणाने जान आणली, पण मंगळवेढ्याचे प्रा. शिवाजीराव काळुंगे यांनी मांडलेला मुद्दा विशेष चर्चेचा विषय बनला आहे. ते म्हणाले, आंध्र प्रदेशातून विभक्त झालेल्या तेलंगणा राज्याने ५०० टीएमसी पाणी उपसा करणारी सिंचन योजना अवघ्या तीन वर्षात पूर्ण केली. ४५ लाख एकर क्षेत्र ओलिताखाली आणणारी ही जगातील सर्वात मोठी उपसा सिंचन योजना आहे.पुढाऱ्यांनी फिरवली पाठ!क्रांतिवीर नागनाथअण्णांनी पुकारलेल्या लढ्यामुळेच टेंभू योजना साकारली. याआधीच्या अनेक पाणी परिषदांना उपस्थित राहणाºया जिल्ह्यातील अनेक नेत्यांनी पाठ फिरवली आहे. तासगावमधून आर. आर. पाटील आमदार होते तेव्हा आणि मंत्री झाले, तरीही परिषदेस येत होते. आता त्यांच्या पत्नी आ. सुमनताई पाटील, खा. संजयकाका पाटील उपस्थित नव्हते. आ. अनिल बाबर अनेकदा आले होते, पण तेही यावेळी उपस्थित नव्हते. माजी आमदार सदाशिवराव पाटील सलग दोनवेळा आमदार झाले. त्यांच्या कार्यकाळात कृष्णामाई आटपाडीत अवतरली, तेही परिषदेकडे फिरकले नाहीत.