लोकमत न्यूज नेटवर्क
वाळवा : क्रांतिवीर डाॅ. नागनाथअण्णांच्या खोलीत गेल्यावर मला माझ्या माहेरी आल्यासारखे वाटते. त्यांचे विचार समाजासाठी नेहमी प्रेरणादायी राहतील, असे प्रतिपादन सांगलीच्या संपदा ग्रामीण महिला संस्थेच्या (संग्राम) सचिव मीना सरस्वती शेषू यांनी बुधवारी केले.
येथे ‘स्व. अरुणभैय्या नायकवडी स्मृती राज्यस्तरीय पुरस्कारा’ने मीना शेषू यांचा हुतात्मा उद्योग समूहाचे प्रमुख वैभव नायकवडी यांच्याहस्ते गाैरव करण्यात आला. यावेळी त्या बोलत होत्या. मानपत्र, स्मृतिचिन्ह व रोख २५ हजार रुपये असे पुरस्काराचे स्वरूप होते. यावेळी दापाेली कृषी विद्यापीठात प्रथम क्रमांक पटकावलेल्या श्वेता मयेकर या विद्यार्थिनीचा ‘लोकमत’चे संपादक वसंत भोसले यांच्याहस्ते गौरव करण्यात आला.
मीना शेषू म्हणाल्या की, नागनाथअण्णांच्या विचारांचा आदर्श घेऊन ‘संग्राम संस्था’ गेली २७ वर्षे कार्यरत आहे. या संस्थेने एचआयव्ही जनजागृतीबाबत केलेल्या कामाची दखल सरकारी पातळीवर घेण्यात आली. नागनाथअण्णांनी दाखविलेल्या वाटेवर संग्राम संस्थेची वाटचाल यापुढेही सुरू राहील.
वसंत भोसले म्हणाले की, सातारच्या प्रतिसरकारचे महाराष्ट्रात स्मारक हवे होते; परंतु ते झाले नाही. महाराष्ट्राच्या इतिहासातून प्रतिसरकारचे पानच गळून गेले आहे. राज्य सरकारनेसुद्धा प्रतिसरकारचा अमृतमहोत्सव साजरा केला नाही, याची खंत वाटते. डाॅ. नागनाथअण्णांबरोबर वडिलकीचे नाते हाेते. ते केव्हाही संपणार नाही.
वैभव नायकवडी म्हणाले, मीनाताईंना पुरस्कार देण्याचा समितीचा निर्णय कौतुकास्पद आहे. सामाजिक क्षेत्रात संग्राम संस्थेने दिलेल्या याेगदानाचा गाैरव यानिमित्ताने करता आल्याचा आनंद आहे.
प्रा. के. बी. पाटील यांनी प्रास्ताविक केले. मानपत्राचे वाचन प्रा. राजा माळगी यांनी केले.
प्राचार्या डाॅ. सुषमा नायकवडी, सरपंच डाॅ. शुभांगी माळी, गौरव नायकवडी, नंदिनी नायकवडी, महादेव कांबळे, भगवान पाटील, दिनकर बाबर, यशवंत बाबर, कार्यकारी संचालक धीरजकुमार माने, आनंदराव शिंदे, विश्वास मुळीक उपस्थित होते. मुख्याध्यापक मधुकर वायदंडे यांनी आभार मानले.
चाैकट
पुरस्काराची रक्कम सम्यक विद्राेही प्रबाेधन संस्थेला
‘अरुणभैय्या नायकवडी स्मृती पुरस्कारा’च्या मानकरी मीना शेषू यांनी पुरस्काराची २५ हजार रुपयांची रक्कम सम्यक विद्रोही प्रबोधन संस्थेला देणगी म्हणून दिली.
चौकट
झारीतील शुक्राचार्यांमुळे सहकाराला घरघर
वैभव नायकवडी म्हणाले की, सहकारामधील झारीतील शुक्राचार्यांमुळे उसाची एफआरपी वाढते, पण साखरेची एमआरपी वाढत नाही. त्यामुळे एफआरपी देण्यासाठी हुतात्मा साखर कारखान्यास शंभर कोटींहून अधिक कर्ज घ्यावे लागते. सहकार संपविण्याचे काम चालले आहे.