फुकटचे श्रेय लाटण्याचा आमदारांचा स्वभाव जुनाच : सत्यजित देशमुखसागाव : आघाडी सरकारच्या काळात मंजूर झालेल्या कामांचे उद्घाटन व भूमिपूजन समारंभ घेऊन भाजपचे आमदार शिवाजीराव नाईक यांनी युती सरकारची प्रशासकीय वचनपूर्ती साजरी केली. हे आमदारांच्या प्रगल्भतेला शोभनीय नाही. फुकटचे श्रेय घेण्याचा हा त्यांचा स्वभाव जुनाच आहे, अशी टीका प्रदेश काँग्रेस सरचिटणीस सत्यजित देशमुख यांनी केली.देशमुख म्हणाले की, काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी सरकारच्या काळामध्ये तत्कालीन विधानपरिषद सभापती शिवाजीराव देशमुख यांनी, तत्कालीन बांधकाममंत्री छगन भुजबळ यांनी कापूसखेड-नेर्ले पुलाचा जोडरस्ता, संरक्षक भिंत बांधणे, वाटेगाव-करमाळा रस्ता सुधारण करणे, करमाळा-भाटवाडी रस्ता सुधारणा, लाडेगाव-वशी-कुरळप रस्ता सुधारणा करणे या कामांसाठी निधी मंजूर केला आहे. परंतु भाजप सरकारच्या वचनपूर्तीच्या निमित्ताने आम्ही मंजूर केलेल्या कामांचे उद्घाटन, भूमिपूजन घेऊन आमदारांनी एक वर्षातील अपयश लपविण्याचा प्रयत्न केला आहे.ते म्हणाले की, विद्यमान आमदारांनी बोलण्यापेक्षा वाकुर्डे बुद्रुक योजनेला १५0 कोटी रुपयांचा निधी आणावा. आमच्या शेतकऱ्यांना फायदे मिळवून देण्यासाठी प्रयत्न केले, तर बरे होईल. राजकारणाच्या फडामध्ये शोभणारी भाषा त्यांनी जनतेच्या प्रश्नाबाबत लागू करू नये. गिरजवडे एम. आय. टँक कोणी मंजूर केला, याची कल्पना उत्तर विभागातील जनतेला आहे. तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, जलसंधारणमंत्री नितीन राऊत यांच्या प्रयत्नातून हा प्रकल्प अनुशेषातून बाहेर काढून शिवाजीराव देशमुख यांनी मंजूर करुन घेतला आहे. विद्यमान आमदारांचा याच्याशी काहीही संबंध नाही. (वार्ताहर)उत्तर भागाला आमदारांनी विकासापासून वंचित ठेवले : मानसिंगराव नाईकशिराळा : विद्यमान आमदारांनी तालुक्याच्या उत्तर विभागाला विकासापासून वंचित ठेवल्याने त्यांचे कार्यकर्ते राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रवाहात सहभागी होत आहेत, असे प्रतिपादन माजी आमदार मानसिंंगराव नाईक यांनी केले. निगडी (ता. शिराळा) येथे शिवाजीराव नाईक गटाच्या उपसरपंच शारदा पाटील यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस प्रवेश समारंभात ते बोलत होते. नाईक म्हणाले, विधानसभा निवडणुकीत निसटता पराभव झाला म्हणून मी समाजकारणात मागे पडलेलो नाही. मतदारसंघातील सार्वजनिक हिताचे प्रश्न घेऊन लढणार आहे. दुष्काळसदृश परिस्थिती असताना शासनदरबारी बाजू मांडण्यापेक्षा विद्यमान आमदार मंत्रिपदासाठी पायघड्या घालत आहेत. संपूर्ण शिराळा तालुका दुष्काळग्रस्त जाहीर करण्यासाठी मोर्चा काढला. तालुक्याचा दुष्काळग्रस्त गावांच्या यादीत समावेश नसल्यास पुन्हा आंदोलन उभारणार आहे. ते म्हणाले, राज्य व केंद्र शासनाचे सहकार्य नसल्याने साखर कारखानदारी प्रतिकूल परिस्थितीतून जात आहे. त्यातूनही आर्थिक शिस्त ठेवल्याने ‘विश्वास’ची वाटचाल नेटकेपणाने सुरू आहे. विनोद आढाव यांनी स्वागत केले. उपसरपंच शारदा पाटील, जयवंत पाटील, अविनाश, सुशांत, सुनीता, रघुनाथ व सुभाष साळुंखे, मालन माने, इंदूबाई, अमित, बाबासाहेब व दादासाहेब पाटील यांनी आमदार नाईक गटातून राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला. त्यांचा सत्कार नाईक यांच्याहस्ते झाला. यावेळी नाईक दूध संघाचे संचालक आनंदराव यादव, यशवंत निकम, नंदाताई भालेकर, सुभाष साळुंखे, गणपती साळुंखे, विलास पाटील उपस्थित होते. (वार्ताहर)‘एफआरपी’बाबत विरोधकांनी उगाच नक्राश्रू गाळू नयेत : रणधीर नाईककोकरुड : आमच्या साखर कारखान्याच्या एफआरपीएवढी रक्कम शेतकऱ्यांना द्यावी म्हणणाऱ्यांनी केंद्र व राज्य सरकारच्या मदतीनंतरच स्वत:ची एफआरपी दिली. आम्हीदेखील थोड्याच दिवसात ही रक्कम वर्ग करणार आहोत. याबाबत विरोधकांनी उगीच नक्राश्रू गाळू नयेत, अशी टीका जि. प. सदस्य रणधीर नाईक यांनी माजी आमदार मानसिंगराव नाईक यांचे नाव न घेता शिराळा येथे आयोजित पत्रकार बैठकीत केली. ते म्हणाले की, शासन साखर कारखान्यांच्या विरोधात असल्याचा गैरसमज काँग्रेस व राष्ट्रवादीने पसरवला आहे. मात्र याच शासनाने कारखान्यांना अर्थपुरवठा केला. त्यामुळे एफआरपी देणे त्यांना शक्य झाले आहे. आम्हीदेखील विरोधकांच्या बरोबरीनेच दर दिला आहे. आमचा वजन-काटा चोख आहे. शासनाकडून आमच्या कारखान्याबाबत लवकरच निर्णय होणार आहे. आम्ही गेल्या हंगामातील शेतकऱ्यांची पै न् पै दिली आहे. गत हंगामातील सर्व देणी शंभर टक्के भागवली आहेत. अशी वस्तुस्थिती असताना, अपप्रचार सुरु आहे. कदाचित विधानसभेतील पराभवामुळे यांना काही भ्रम होत असावेत. नाईक म्हणाले की, आपल्या बगलबच्च्यांमार्फत आपल्याच कारखान्याच्या खासगीकरणाचा ठराव कोणी मांडला, हे सर्व शेतकरी जाणून आहेत. सभासदांनी हातात दांडके घेतल्यावर हंगाम प्रारंभावेळी पूर्वीची भूमिका बदलत आपल्या मनात खासगीकरणाचे पाप नाही, अशी सोयीस्कर भूमिका माजी आमदारांनी घेतली आहे. उगीच चुकीचे आणि खोटे आरोप करणाऱ्यांनी ते सिद्ध करावेत, आम्ही त्यांची माफी मागू; परंतु ते सिद्ध करता येत नसतील, तर त्यांनी आमची माफी मागावी, असेही ते म्हणाले. (वार्ताहर)
शिराळ्यात नाईक, देशमुखांचे एकमेकांवर टीकास्त्र
By admin | Published: November 04, 2015 11:08 PM