सांगली : दिवंगत स्वातंत्र्यसैनिक नामदेवराव कराडकर स्मृती प्रतिष्ठानतर्फे येत्या २0 जानेवारी रोजी गौरव सोहळा आयोजित केला असून, यामध्ये लेखक नामदेव माळी यांना सन्मानित करण्यात येणार आहे, अशी माहिती प्रतिष्ठानचे महेश कराडकर, राजेश कराडकर यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली.
येथील मथुबाई गरवारे कन्या महाविद्यालयाच्या सभागृहात २0 जानेवारी रोजी सायंकाळी ५ वाजता नामदेवराव कराडकर स्मृती दिनाचा कार्यक्रम होणार आहे. ज्येष्ठ साहित्यिक डॉ. तारा भवाळकर, प्रा. डॉ. बाबूराव गुरव यांच्याहस्ते नामदेव माळी यांचा गौरव करण्यात येणार आहे.
स्वातंत्र्य चळवळ, स्वातंत्र्योत्तर काळात कामगार चळवळ, संयुक्त महाराष्टÑ चळवळ आणि गोवामुक्ती संग्रामात नामदेवराव कराडकर यांनी धडाडीने काम केले. याशिवाय सहकार, शिक्षण, पत्रकारिता, अध्यात्म आदी क्षेत्रातही त्यांनी तळमळीने काम केले होते. दरवर्षी त्यांच्या स्मृतिदिनी विविध क्षेत्रात भरीव कामगिरी करणाऱ्या, योगदान देणाºया व्यक्तींना सन्मानित करण्यात येते. यंदा शिक्षणमित्र व लेखक नामदेव माळी यांची निवड करण्यात आली आहे.
संवेदनशील लेखक म्हणून गेली तीस वर्षे माळी हे शैक्षणिक क्षेत्रात कार्यरत आहेत. प्रशासकीय सेवेत विद्यार्थी, शिक्षक, पालक या तिन्ही बाबींना पूरक कार्य करून त्यांनी शैक्षणिक दर्जा उंचावण्याचे काम केले. उपक्रमशील शाळांना बळ देण्यातही त्यांनी पुढाकार घेतला आहे. या कार्याची दखल घेऊन यंदा त्यांना सन्मान होणार आहे.