सांगली : वाळवा पंचायत समितीच्या नूतन सभागृहाला लोकनेते राजारामबापू पाटील यांचे नाव देण्याचा ठराव जिल्हा परिषद सर्वसाधारण सभेत अध्यक्षा रेश्माक्का होर्तीकर यांनी मंजूर केला. त्यास राष्ट्रवादीच्या सर्व सदस्यांनी पाठिंबा दिला. अध्यक्षांच्या या निर्णयावर सदस्य रणधीर नाईक, सम्राट महाडिक यांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त करून, पदाधिकाऱ्यांचा निषेध करीत सभात्याग केला. पदाधिकारी, अधिकाऱ्यांच्या भूमिकेविरोधात न्यायालयात दाद मागण्याचा इशाराही नाईक व महाडिक यांनी दिला. वाळवा पंचायत समितीच्या जुन्या इमारतीमधील सभागृहास वसंतदादा पाटील यांचे नाव देण्यात आले होते. त्यानंतर वर्षभरापूर्वी वाळवा पंचायत समितीची नवीन इमारत बांधली आहे. या इमारतीतील सभागृहास लोकनेते राजारामबापू पाटील यांचे नाव देण्यात आले आहे. दोन नेत्यांच्या नावावरून गेल्या दोन महिन्यांपासून वाद सुरू आहे. वाळवा पंचायत समितीने मासिक सभेमध्ये सभागृहाला राजारामबापू पाटील यांचे नाव देण्याचा ठराव मंजूर केला आहे. त्यानंतर सभागृहास बापूंचे नाव दिले आहे. याला वाळवा तालुक्यातील वसंतदादाप्रेमींनी तीव्र विरोध केला होता. सदस्य सम्राट महाडिक म्हणाले की, राज्य शासनाच्या २००४ मधील आदेशानुसार, शासकीय कार्यालय, सभागृहाला कोणत्याही राजकीय नेत्याचे नाव देता येत नाही. तरीही वाळवा पंचायत समितीला बापूंचे नाव दिल्याप्रकरणी सभापती रवींद्र बर्डे, गटविकास अधिकारी यांच्यावर जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी कारवाई करण्याची मागणी केली. महाडिक यांची ही मागणी धुडकावून लावत राष्ट्रवादी सदस्यांनी एकमताने मंजुरीचा ठराव मांडला. अखेर अध्यक्षा रेश्माक्का होर्तीकर यांनी, वाळवा पंचायत समितीने राजारामबापू यांचे नाव देण्याचा केलेला ठराव योग्य आहे, त्यामुळे जिल्हा परिषद सभागृह त्या ठरावास मंजुरी देत आहे, असे सांगून, नाव देण्याबाबतची शासकीय पातळीवरील कायदेशीर प्रक्रिया वाळवा पंचायत समितीने पूर्ण करावी, अशी सूचनाही त्यांनी संबंधित पदाधिकारी व अधिकाऱ्यांना केली. होर्तीकर यांनी ठराव मंजूर करताच रणधीर नाईक यांनी आक्रमक भूमिका घेतली. अध्यक्षांनी शासकीय आदेश डावलून ठराव मंजूर केला आहे, हे पूर्णत: चुकीचे आहे. या निर्णयाविरोधात आम्ही न्यायालयात दाद मागणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. सत्ताधारी बहुमताच्या जोरावर चुकीचा ठराव करीत असल्यामुळे त्यांनी पदाधिकाऱ्यांचा निषेध करून सभात्याग केला. सम्राट महाडिक यांनीही प्रशासन व पदाधिकाऱ्यांचा निषेध करून सभात्याग केला. अखेर सदस्यांनी समजूत काढल्यानंतर दहा मिनिटांनी दोन्ही सदस्य सभागृहात हजर झाले. या सदस्यांना काँग्रेसच्या सदस्यांकडून म्हणावे तसे पाठबळ मिळाले नाही. उपाध्यक्ष लिंबाजी पाटील म्हणाले की, जुन्या सभागृहाला दादांचे नाव असून, नवीन सभागृहाला बापूंचे नाव दिले आहे. यामुळे दादांचे नाव पुसले जाणार नाही. यावर सम्राट महाडिक यांनी, जुनी इमारत पाडण्यात येणार असल्यामुळे दादांचे नाव कसे राहणार, असा प्रश्न उपस्थित केला. या प्रश्नावर वाळवा पंचायत समितीचे सभापती रवींद्र बर्डे यांनी जुनी इमारत पाडली तरीही, दादांचे नाव पुसले जाणार नाही, याची आम्ही काळजी घेऊ, असा प्रतिटोला लगाविला. माजी अध्यक्ष देवराज पाटील म्हणाले की, दादा आणि बापूंचे जिल्ह्यासाठी तेवढेच योगदान आहे. त्यांच्या नावावरून कारण नसताना वादंग निर्माण करू नये. भीमराव माने, सुरेश मोहिते आदी सदस्यांनीही चर्चेत भाग घेतला. (प्रतिनिधी) दोघांचा सभात्याग : कॉँग्रेस सदस्यांचे मौन नामकरण प्रश्नावर रणधीर नाईक, सम्राट महाडिक यांनी सभा त्याग केला. या दोन सदस्यांना काँग्रेसच्या पक्षप्रतोद सुरेश मोहिते यांच्यासह अन्य एकाही सदस्याने त्यांच्याबरोबर जाऊन साथ दिली नसल्यामुळे सत्ताधाऱ्यांनी बहुमताने ठराव मंजूर केला. पदाधिकारी चुकीच्या पध्दतीने ठराव मंजूर करीत असल्याचे नाईक सांगत होते. यावरही काँग्रेस सदस्यांनी मौन बाळगले. अध्यक्षांनी राजीनामा द्यावा - महाडिक शासनाची परवानगी न घेता पंचायत समिती सभागृहाला नाव दिल्याप्रकरणी संबंधित अधिकारी, पदाधिकाऱ्यांवर जिल्हा परिषदेने कारवाई करावी. कारवाई करणार नसाल तर, अध्यक्षा होर्तीकरांना अध्यक्षपदाच्या खुर्चीवर राहण्याचा नैतिक अधिकार नाही, अशी टीका सम्राट महाडिक यांनी केली. भावना दुखावल्या..! ४अध्यक्षांनी ‘राजारामबापू पाटील सभागृह’ असे नामकरण करण्याच्या ठरावास मंजुरी दिली. त्यानंतर संतप्त भावना व्यक्त करताना रणधीर नाईक यांनी तुम्ही दादांचे नाव बदलून दादाप्रेमींच्या भावना दुखाविल्या आहेत, अशी खंत व्यक्त केली.
वाळवा पंचायत समिती सभागृहास बापूंचेच नाव
By admin | Published: November 19, 2015 12:24 AM