सांगली/दुधगाव : वारणा नदी काठावर नव्याने बांधण्यात येत असलेल्या दुधगाव-खोची या पुलास शहीद नितीन कोळी यांचे नाव देण्यात येईल, अशी घोषणा राज्य शासनातर्फे सार्वजनिक बांधकाममंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी अत्यसंस्कारावेळी केली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शासनातर्फे नितीन कोळी यांच्या कुटुंबास १५ लाखांची, तर सांगलीतील भारतीय जनता पार्टीने पाच लाखांची मदत जाहीर केली आहे. शुक्रवारी रात्री सीमेवर गस्त घालत असताना पाकिस्तानी सैन्याशी झालेल्या चकमकीत नितीन कोळी यांना वीरमरण आले होते. सोमवारी दुधगाव या जन्मगावी वारणा नदीकाठी नितीन कोळी यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. नदीकाठाला लागूनच दुधगाव-खोची या नवीन पुलाचे काम सुरू आहे. या पुलास शहीद नितीन कोळी यांचे नाव देण्याची घोषणा मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी केली. तसे आदेशही त्यांनी पाटबंधारे विभागास दिले. सध्या या पुलाचे काम थांबले असले, तरी ते लवकरच पूर्ण केले जाईल, असेही पाटील यांनी सांगितले. भारतीय जनता पक्षाचे सर्व पदाधिकारी अंत्यसंस्कारास उपस्थित होते. त्यांनी नितीन कोळी यांच्या कुटुंबास पक्षातर्फे पाच लाखांची मदत देण्याची घोषणा केली. नितीन यांचा मोठा मुलगा देवराज सध्या दुधगावच्या लिटर स्टार इंग्लिश मेडियम स्कूलमध्ये लहान गटात शिकत आहे. त्याच्या दहावीपर्यंतच्या शिक्षणाची जबाबदारी याच स्कूलने स्वीकारली असल्याची घोषणाही करण्यात आली. दरम्यान, काँग्रसेचे जिल्हाध्यक्ष मोहनराव कदम, सर्वोदय सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष पृथ्वीराज पवार, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे माजी आमदार बाळा नांदगावकर, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष रणजित पाटील, माजी जिल्हा परिषद सदस्य अभिजित पाटील यांनी सोमवारी दुपारी नितीन कोळी यांच्या घरी कुटुंबीयांची भेट घेऊन सांत्वन केले. ग्रामस्थांचीही दिवसभर सांत्वनासाठी गर्दी होती. (प्रतिनिधी)
दुधगाव-खोची पुलास शहीद नितीन यांचे नाव
By admin | Published: November 02, 2016 12:15 AM