सांगली : जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा न्यायालयाची इमारत आणि आता महापालिकेचे नवीन मुख्यालय यामुळे विजयनगर, वालनेसवाडीच्या परिसराला नवी झळाळी आहे. वालनेसवाडीत अनेक मोठ्या इमारती, अपार्टमेंट उभी राहिली. हार्ट ऑफ सिटी म्हणून नवी ओळखही मिळाली; पण पायाभूत सुविधांबाबत मात्र हा परिसर नेहमीच दुर्लक्षित राहिला आहे. गेल्या २० वर्षांपासून ड्रेनेज, नाला, रस्ते, गटारी या प्रश्नांनी त्रस्त असलेल्या वालनेसवाडीकरांना आता पार्किंगसह अनेक नव्या समस्यांनाही तोंड द्यावे लागत आहे. हा परिसर महापालिकेत समाविष्ट असला तरी पूर्वीची ग्रामपंचायतच बरी म्हणण्याची वेळ नागरिकांवर आली आहे.
१९९८ साली महापालिकेत वालनेसवाडी ग्रामपंचायतीचा समावेश करण्यात आला. आधीच विकासात मागास असलेल्या या परिसरातील नागरिकांच्या आशा उंचावल्या होत्या; पण गेल्या २२ वर्षांत वानलेसवाडीकरांच्या पदरी निराशाच आली आहे. या परिसरात नव्याने अनेक अपार्टमेंट, व्यापारी संकुले, शासकीय कार्यालये थाटली गेली; पण मूलभूत सुविधांकडे मात्र दुर्लक्ष झाले. त्यामुळे या परिसराला कोणी वाली नसल्याची भावना निर्माण झाली आहे. आणखी किती वर्षे नरकयातना भोगायच्या, असा सवालही नागरिक करीत आहेत. त्यात अनेक नव्या समस्यांची डोकेदुखी वाढली आहे. शासकीय कार्यालयामुळे वाहनांच्या पार्किंगचा प्रश्न गंभीर बनला आहे. ड्रेनेज योजनेची गरज असतानाही तिकडे दुर्लक्ष होत आहे. एकीकडे सांगलीवाडी, समतानगरसारख्या उपनगरांचा विकास होत असताना वालनेसवाडीच मागे का, याचे उत्तर कुणाकडेच नाही.
चौकट
पार्किंगची समस्या
वानलेसवाडी परिसरात प्रशासकीय इमारत, जिल्हाधिकारी कार्यालय, न्यायालयाच्या टोलेजंग इमारती उभ्या राहिल्या आहेत. त्यात न्यायालयाची इमारतीतील पार्किंगची जागा कमी पडत आहे. त्यामुळे रस्त्यावर अस्ताव्यस्त वाहने पार्क केली जात आहेत. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर दररोज आंदोलने होतात. तेव्हा वाहतूक व्यवस्थाही ठप्प होते. त्यात आता महापालिकेचे मुख्यालयही होणार असल्याने ही समस्या आणखीन गंभीर बनणार आहे. न्यायालयात महापालिकेच्या मालकीचा खुला भूखंड आहे. त्यावर झोपडपट्टी आहे. या झोपडपट्टीवासीयांचे पुनर्वसन करून या जागेत पार्किंगची व्यवस्था करावी. तसेच न्यायालयासमोर जिल्हा परिषदेची शाळा बंद पडण्याच्या मार्गावर आहे. ही शाळा ढेरे मळा येथे वापराविना पडून असलेल्या इमारतीत स्थलांतर करून या जागेत पार्किंगची व्यवस्था होऊ शकते.
चौकट
सांडपाण्यामुळे दुर्गंधी
कुपवाड, वारणाली, विजयनगरमधून येणारे सांडपाणी नैसर्गिक नाल्यात साठून दुर्गंधी पसरत आहे. त्यामुळे जिल्हा न्यायालयाच्या इमारतीच्या पूर्व बाजूकडून कुंभार मळ्यापर्यंत भुयारी गटार योजना करण्याची गरज आहे.
चौकट
रस्त्यावर अतिक्रमणे
जिल्हा कोर्टासमोरील ८० फुटी व वालनेसवाडीतील ४० फुटी रस्त्याचे मार्किंग केले आहे. या रस्त्यावर खोकी, चहाचे गाडे, पत्र्याचे शेड, सिमेंटचे पोल, काटेरी कुंपण घालून अनेकांनी अतिक्रमण केले आहे. शिवाय रस्त्याला मार्जिन न सोडता अनेक इमारतींना महापालिकेने परवानगी दिली आहे.
चौकट
ड्रेनेजची गरज
कुपवाड ड्रेनेज योजनेचा आराखडा तयार करण्याचे काम सुरू आहे; पण या योजनेत वालनेसवाडीचा समावेश झालेला नाही. त्यामुळे या भागात ड्रेनेज योजना कधी होणार? असा प्रश्न आहे.
चौकट
कोट
महापालिकेत वालनेसवाडीचा समावेश होऊन २२ वर्षे झाली. या काळात एकही मोठी योजना परिसरात झाली नाही. एक-दोन रस्ते, गटारी यापेक्षा मोठी विकस कामे नाहीत. वालनेसवाडीला कोणी नेता, कार्यकर्ता नाही म्हणून किती वर्षे यातना भोगायच्या? - रामचंद्र बेले, माजी सरपंच