सांगली : रेवदंडा. ता.अलिबाग. जि.रायगड येथील डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानतर्फे शनिवारी सांगली, कोल्हापूर व सातारा जिल्ह्यातील पूरग्रस्त गावे आणि शहरांची स्वच्छता करण्यात आली. ही स्वच्छता मोहिम 'स्वच्छ भारत अभियानाचे' स्वच्छता दूत डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ.आप्पासाहेब धर्माधिकारी व रायगड भुषण सचिन धर्माधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आली.
शनिवारी सातारा जिल्ह्यातील खुबी, रेठरे बुद्रुक,शेरे,कोडोली, गोंदी, दुशीरे आणि सांगली जिल्ह्यातील शिरटे, शिगाव तसेच शिराळा तालुकामध्ये पुनवत व सागाव या गावांमधे स्वच्छता अभियान राबवण्यात आले. यासाठी ट्रॅक्टर, जेसीबी इत्यादी वाहने वापरली. या अभियानात प्रतिष्ठानचे १००० सदस्य सहभागी झाले होते. पूरग्रस्त जिल्ह्यातील ठिकाणी १२९.१०० किलो कचरा जमा करण्यात आला.
हा सर्व कचरा वाहनाद्वारे योग्य त्या ठिकाणी पोचवण्यात आला. या वेळी सर्व ग्रामपंचायत सदस्य व ग्रामसेवक हजर होते. या कामासाठी वाहतूक यंत्रणा व हँण्डग्लोवज व मास्क प्रतिष्ठानतर्फे देण्यात आले होते .