सांगलीत सावली केंद्रातील वृद्धांसोबत अभिनंदन महिनाभर रमला होता.
लोकमत न्यूज नेटवर्क
सांगली : लॉकडाऊनमध्ये कामावरून काढून टाकल्याने भरकटत आलेल्या तरुणाला येथील सावली आधार केंद्राने आश्रय दिला. महिनाभर प्रेमाची ऊब दिल्यानंतर त्याला मूळ गावी नांदेडला पाठवले. केंद्राचे संचालक मुस्तफा मुजावर यांच्या पुढाकारातून त्याला हक्काचा निवारा मिळाला.
अभिनंदन अशोक ऐनापुरे, असे या तिशीतील पदवीधारक तरुणाचे नाव. विजयपूर येथे एका हॉटेलमध्ये तो व्यवस्थापकाची नोकरी करत होता. लॉकडाऊनमध्ये नोकरी गमवावी लागली. थोडेफार पैसे घेऊन गावाकडे निघाला. प्रवासात पैसेही संपले. दुकाने आणि हॉटेल्स बंद असल्याने रस्त्याकडेच्या झाडांवरील फळे खाऊन भूक भागवण्याची वेळ त्याच्यावर आली.
तब्बल ३५४ किलोमीटर चालत तो सांगलीत पोहोचला. ही घटना महिनाभरापूर्वीची. विश्रामबाग पोलीस ठाण्यातील एका कर्मचाऱ्याची नजर त्याच्यावर पडली. त्याच्या माणुसकीमुळे तब्बल सात दिवसांनी अभिनंदनच्या पोटात अन्न पडले. पोलिसांनी सावली केंद्रामध्ये त्याला पाठवले. मुस्तफा मुजावर यांनी आश्रय दिला, नांदेडला कुटुंबीयांशी संपर्कही साधला.
नांदेड जिल्ह्यात मानमाड हे त्याचे गाव होते. लॉकडाऊनमुळे प्रवास शक्य नसल्याने महिनाभर तो केंद्रातच राहिला. त्याच्याशी संपर्क झाल्याने कुटुंबीय खुश होते. लॉकडाऊनमध्ये थोडी शिथिलता मिळाल्यानंतर त्याला नांदेडला पाठविण्याची व्यवस्था झाली. सख्ख्या भावाप्रमाणे सावलीतील रहिवाशांनी अभिनंदनला निरोप दिला. महापालिका उपायुक्त स्मृती पाटील यांनी प्रवास खर्च आणि खाद्यपदार्थ दिले. मंगळवारी गावी पोहोचल्यानंतर त्याने ख्यालीखुशाली कळवली.