युनूस शेख ।इस्लामपूर : चालता-बोलता, हसत-खेळत बागडणाऱ्या नंदूवर नियतीने वयाच्या चौदाव्यावर्षी आघात केला. तापाचे निमित्त होऊन आलेल्या झटक्यात त्याचा कमरेखालचा भाग, दोन्ही पाय संवेदनाहीन झाले. त्यातच तो गतिमंदही झाला, पण परिस्थितीला हार गेला नाही. या सर्व आघातांवर मात करत नंदू अगरबत्ती विक्रीचा व्यवसाय करून स्वाभिमानाने अन् टेचात जगतोय. त्याचे हे जगणे हात-पाय, डोक्याने धड असणाºया सर्वांनाच पथदर्शी ठरणारे आहे.
नंदकुमार बाळासाहेब माळी (वय ३३) असे या अपंगत्वावर मात करत जगणाºया तरुणाचे नाव. आष्टा नाका परिसरातील कुंभार गल्लीत तो आई, वडील, भाऊ आणि वहिनी अशा कुटुंबात राहतो. घरची परिस्थिती तशी बेताची... दररोज कष्ट करून उपजीविका करणारे कुटुंब. नंदू नववीत होता त्यावेळी त्याला ताप आला. ताप किरकोळ समजून कुटुंबाने त्याकडे दुर्लक्ष केले आणि त्याच तापाच्या झटक्यात नंदूला अपंगत्व आले. मात्र तो त्याला हार गेला नाही.
या कठीण प्रसंगातही नंदूच्या भावना, जाणिवा आणि संवेदना नेहमीच सकारात्मक राहिल्या. गेल्या दोन-तीन वर्षांपासून त्याने स्वत:च्या जगण्याच्या संघर्षाला सुरुवात केली. शहरातील सामाजिक कार्यकर्ते सचिन देवकर यांनी तीनचाकी सायकल भेट देत नंदूच्या जिद्दीला बळ दिले. या सायकलवरून त्याची शहरात रपेट सुरू झाली. त्यातच कुटुंबावर भार बनून जगण्यापेक्षा काहीतरी काम करावे, ही जाणीव त्याला झाली. त्यानंतर त्याने अगरबत्ती विक्रीचा व्यवसाय सुरू केला. सकाळी ८ ते १२ आणि सायंकाळी ४ ते ८ अशा दोन सत्रात नंदू आपल्या व कुटुंबाच्या उपजीविकेसाठी ८ तास राबू लागला. बाजार गाळ्यातील एका दुकानातून घाऊक (होलसेल)दराने तो अगरबत्ती खरेदी करतो. मग शहरातील विविध भागात फिरून त्याची विक्री करतो. या कामातून तो दिवसभरात किमान १०० ते १५० रुपये मिळवतो. यातून त्याने आतापर्यंत २० हजार रुपयांची बचतही केली आहे.
किरकोळ तापाचे निमित्त...किरकोळ तापाचे निमित्त होऊन आलेल्या अपंगत्वामुळे नंदूचे कुटुंब हादरून गेले. अनेक डॉक्टर, औषधोपचार झाले, मात्र नंदूचे अपंगत्व हटले नाही. हसत-खेळत बागडणारा नंदू एकाच जागेवर पडून राहिला. सर्व उपचार करून थकलेल्या कुटुंबाने आपल्या पोरावरील आघातापुढे हात टेकले. जवळपास १० वर्षे सर्वांनी नंदूसाठी झगडा दिला, मात्र यश आले नाही. त्यातच तो गतिमंदही झाला.
बचतीचे पैसे आईसाठी...नंदूचा आपल्या आईवर फार जीव आहे. या पैशांचे काय करणार, असे विचारल्यावर नंदू एकदम उसळून बोलतो. ‘म्हातारपणी आईला व मला कोण सांभाळणार? त्याची जुळणी म्हणून मी ही बचत करतो. म्हातारपणी कुणासमोर हात पसरायला लागू नयेत यासाठीच सारी धडपड सुरू आहे, असे सांगताना त्याचे डोळे भरून येतात.
इस्लामपूर येथील नंदकुमार माळी अपंगत्वावर मात करून स्वाभिमानाने अगरबत्ती विक्रीचा व्यवसाय करीत आहे.