सांगली : विकासाचे कोणतेही मुद्दे नसल्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी अत्यंत खालच्या स्तरावर टीका करीत आहेत. दिवंगत कॉंग्रेस नेते राजीव गांधी यांच्यावर भ्रष्टाचाराचे तथ्यहिन आरोप केल्याप्रकरणी मोदी यांचा आम्ही निषेध करीत आहोत, असे कॉंग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.ते म्हणाले की, कॉंग्रेसच्या बैठकीत सर्व कार्यकर्त्यांनी याविषयी संताप व्यक्त करीत निषेध केला आहे. एकविसाव्या शतकाकडे जाताना संगणक, इंटरनेट यांच्या माध्यमातून प्रगतीचे द्वार खुले करण्याचे काम राजीव गांधी यांनी केले होते. उच्च न्यायालयाने त्यांना भ्रष्टाचाराच्या आरोपातून मुक्त केले होते. त्यामुळे एक प्रगतशील विचारांचे आणि प्रामाणिक नेते म्हणून प्रतिमा असलेल्या राजीव गांधी यांच्यावर अत्यंत खालच्या स्तरावर मोदी टीका करीत आहेत.
मृत व्यक्तीबद्दल सहसा कुणी वाईट बोलत नसते. तो एक शिष्टाचार मानला जातो, मात्र मोदींनी या सर्व शिष्टाचारांना काळीमा फासत मृत व्यक्तींवर चुकीच्या पद्धतीने टीका करण्यास सुरुवात केली आहे. त्यांच्या पायाखालची वाळू घसरली असून पराभव सामोरा दिसू लागल्याने त्यांच्या तोंडून वाटेल त्या गोष्टी बाहेर पडत आहेत.आजवरच्या कोणत्याही पंतप्रधानांनी इतकी खालची पातळी गाठली नव्हती. मोदी यांनी त्यांच्या विचारांची कक्षा किती वाईट आणि मर्यादीत आहे, हे दाखवून दिले आहे. जवाहरलाल नेहरु, इंदिरा गांधी, सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांनाच त्यांनी टार्गेट केले आहे. गेल्या पाच वर्षात त्यांना हा देश सांभाळता आला नाही.
विकासाच्या कोणत्याही गोष्टी जमेच्या बाजुस नाहीत. त्यामुळे मुद्दे नसलेल्या मोदींना आता मृत व्यक्तिंवर टीका करण्याशिवाय कोणताही पर्याय नाही, असे वाटू लागले आहे. इतके द्वेषाचे आणि अहंकाराचे राजकारण कोणत्याही नेत्याने केले नाही. हा देश हुकुमशाहीकडे नेण्याचे काम मोदी करीत आहेत. त्यांचे साम्राज्य ढासळताना त्यांना स्पष्टपणे दिसू लागल्याचे त्यांच्या शारीरिक हालचालींवरून दिसत आहे.
भारताची, येथील नेत्यांची आणि राजकारणाची प्रतिष्ठा धुळीस मिळविण्याचे काम ते करीत आहेत. म्हणून अशा वृत्तीचा आम्ही निषेध करीत आहोत. कॉंग्रेस कार्यकर्त्यांमध्येच नव्हे तर देशातील सामान्य जनतेच्या मनातही मोदींच्या या वक्तव्याची निंदा सुरू झाली आहे. त्यांना जनताच धडा शिकवेल, असे पाटील म्हणाले.