खरसुंडी : लाखो भाविकांचे श्रध्दास्थान असलेल्या खरसुंडी (ता. आटपाडी) येथील सिध्दनाथाचा सासनकाठी उत्सव सोहळा ‘नाथबाबांच्या नावानंं चांगभलंऽऽ’च्या जयघोषात, गुलाल-खोबऱ्याच्या उधळणीत, लाखो भाविकांच्या साक्षीने शुक्रवारी पार पडला.डोळ्यांचे पारणे फेडणारा नयनरम्य सासनकाठी सोहळा पाहण्यासाठी आणि नवस फेडण्यासाठी देशाच्या कानाकोपºयातून लाखोच्या संख्येने भाविक नाथनगरीत दाखल झाले होते. दुपारी श्रीनाथ मंदिरात आटपाडीचे मानकरी माजी आमदार राजेंद्रअण्णा देशमुख यांच्याहस्ते मानपान आणि विधिवत धुपारती करून सासनकाठी उत्सवास सुरुवात झाली. पालखीचे श्रीनाथ मंदिराकडून जोगेश्वरी मंदिराकडे प्रस्थान झाले. मंदिर आवारातून विविध गावांतून मानाच्या सासनकाठ्या पारंपरिक वाद्यांच्या तालावर नाचत दाखल झाल्या. मंदिरातून श्रींची धुपारती, भालदार, चोपदार, छत्र, चामर, सेवेकरी, मानकरी असा शाही लवाजमा मुख्य बाजारपेठेतून जात असताना, सभोवताली लाखोंच्या संख्येने उपस्थित भाविकांनी गुलाल, खोबºयाची उधळण केली. ‘नाथबाबांच्या नावानं चांगभलंऽऽ’च्या जयघोषाने नाथनगरी दुमदुमून गेली. गुलाल, खोबºयाची उधळण झेलत श्रींची पालखी आणि मानाच्या सासनकाठ्या मुख्य बाजारपेठेतून जोगेश्वरी मंदिर चौकात दाखल झाल्या. जोगेश्वरी पटांगणात सर्व सासनकाठ्या पालखीस भेटवून मानवंदना दिली. जोगेश्वरी मंदिरात मानकºयांच्या उपस्थितीत पानसुपारी आणि मानपान कार्यक्रम होऊन पालखी पुन्हा श्रीनाथ मंदिराकडे आली. हा उत्सव सोहळा भक्तिमय आणि उत्साही वातावरणात पार पडत असताना, लाखो भाविकांचा महापूर सिध्दनाथनगरीत आला आणि गुलालाने न्हाऊन निघाला.गुलाल, खोबºयाची दुकाने, छोटी-मोठी हॉटेल्स, खानावळी, मिठाई, खेळण्यांची दुकाने यामुळे बाजारपेठ गर्दीने फुलून गेली होती. यात्रेनिमित्त खिलार जनावरांची मोठी आवक झाली. भक्तांनी पिण्याच्या पाण्याची आणि महाप्रसादाची सोय केली होती. गावाबाहेर पार्किंग व्यवस्था करून चारचाकी वाहनांना आत सोडले नसल्यामुळे अडथळा झाला नाही.
नाथबाबांच्या नावानं चांगभलंऽऽ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 14, 2018 12:12 AM