सुशोभिकरणांतर्गत सांगली रेल्वे स्थानकासमोर राष्ट्रध्वज उभारण्यात आला आहे. गेल्या काही दिवसांपासून वादळी वाऱ्यासह पावसाने राष्ट्रध्वजाचा एक कोपरा फाटला होता. रेल्वेस्थानक परिसरातील काही नागरिकांनी रेल्वे अधिकाऱ्यांना हे लक्षात आणून दिले. सांगलीच्या स्टेशन अधीक्षकांनी याबाबत मिरज रेल्वे स्थानकातील वरिष्ठांना कळविले; मात्र राष्ट्रध्वज उतरवला नसल्याने बुधवारी काही नागरिकांनी याबाबत पोलीस नियंत्रण कक्षाला माहिती दिली. मिरज रेल्वे पोलीस ठाण्यातील उपनिरीक्षक रूपाली उबाळे घटनास्थळी दाखल झाल्या. राज्य गुप्त वार्ता विभाग, रेल्वे पोलीस स्थानकात आल्यानंतरही स्थानक अधीक्षक विवेककुमार पोतदार यांनी याबाबत टाळाटाळ केली. तांत्रिक विभागाचे हे काम आहे, ते त्यांनीच करावे, असा पवित्रा घेतला. स्थानक अधीक्षक पोतदार यांना पोलिसांनी खडसावून रेल्वे कर्मचाऱ्यांकडून सन्मानाने राष्ट्रध्वज उतरविला. राष्ट्रध्वज फाटला असतानाही राष्ट्रध्वज उतरविण्यास दोन दिवस विलंब केला व याबाबत माहिती दिली नसल्याने रेल्वे पोलिसांकडून स्थानक अधीक्षकांबाबत अहवाल पुणे रेल्वे विभागीय व्यवस्थापकांकडे पाठविण्यात येणार आहे.
यावेळी विश्रामबाग पोलीस निरीक्षक अनिल तनपुरे, रेल्वेचे पोलीस निरीक्षक संभाजी काळे, उपनिरीक्षक रूपाली उबाळे यांच्यासह रेल्वे पोलीस, रेल्वे सुरक्षा दलाचे कर्मचारी उपस्थित होते.