इस्लामपूर : साखराळे-राजारामनगर येथील विद्यानिकेतन इंग्लिश मेडियम स्कूलच्या तीन खेळाडूंनी आसाम राज्यातील गुवाहाटी येथे झालेल्या कुमार-कुमारी गटाच्या ३६ व्या राष्ट्रीय मैदानी स्पर्धेत एक रौप्यपदक आणि दोन कांस्यपदके पटकाविली.
१६ वर्षे वयोगटात उंच उडी क्रीडा प्रकारामध्ये अथर्व श्रीकांत धज याने १.८६ मीटर उंच उडी मारून द्वितीय क्रमांकासह रौप्यपदक पटकाविले. अवधूत कुमार पाटील याने थाळीफेकमध्ये ४९.९७ मीटर थाळी फेकून कांस्यपदक जिंकले, तर १८ वर्षे मुलींच्या वयोगटातून श्रावणी रामचंद्र देसावळे हिने १.६७ मीटर उंच उडी घेत कांस्यपदक मिळविले.
या मैदानी खेळाडूंनी आंतरराष्ट्रीय प्रशिक्षक सुभाष पवार, क्रीडाशिक्षक विजयकुमार शिंदे, विकास ताटे, एनआयएस प्रशिक्षक अजित शेळके यांचे मार्गदर्शन लाभले. कासेगाव शिक्षण संस्थेचे अध्यक्ष शामराव पाटील, सचिव आर. डी. सावंत, सहसचिव प्रा. डॉ. राजेंद्र कुरळपकर, अधीक्षक ए. डी. पाटील, पर्यवेक्षक एस. एम. पवार, प्राचार्य नारायण कोटूर, पर्यवेक्षक अजित पाटील यांनी यशस्वी खेळाडूंचे अभिनंदन केले.
फोटो - १७०२२०२१-आयएसएलएम- विद्यानिकेतन न्यूज