हरिपूर : सांगलीत चौदा वर्षाखालील ६३ व्या राष्ट्रीय शालेय बेसबॉल स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती जिल्हा क्रीडा अधिकारी अनिल चोरमले यांनी पत्रकार परिषदेत दिली. सांगलीतील जिल्हा क्रीडा संकुलामध्ये १३ ते १६ डिसेंबर २०१७ दरम्यान या स्पर्धा होणार आहेत.
स्पर्धेचे उद्घाटन १३ रोजी सायं. ५ वाजता आॅलिम्पियन व अर्जुन पुरस्कार विजेती ललिता बाबर यांच्याहस्ते, क्रीडा सहसंचालक नरेंद्र सोपल यांच्या उपस्थितीत होणार आहे. अध्यक्षस्थानी जिल्हाधिकारी वि. ना. काळम आहेत.
याप्रसंगी ललिता बाबर यांचा जिल्हाधिकाºयांच्या हस्ते विशेष सत्कार करण्यात येणार आहे. या कार्यक्रमास शिवछत्रपती पुरस्कार विजेते संजय भोकरे, डॉ. समीर शेख, महाराष्ट्र ‘क्रेडाई’चे सहसचिव दीपक सूर्यवंशी, महाराष्ट्र बेसबॉल असोसिएशनचे सचिव राजेंद्र इखनकर, सांगली जिल्हा बेसबॉल असोसिएशनचे अध्यक्ष गौरव नायकवडी उपस्थित राहणार आहेत.
स्पर्धेसाठी भारत देशातून यजमान महाराष्ट्रासह, आंध्र प्रदेश, चंदीगड, छत्तीसगड, दिल्ली, गुजरात, हरियाणा, जम्मू-काश्मीर, मध्य प्रदेश, पंजाब, तेलंगणा, विद्याभारती व सी.बी.एस.सी. अशा एकूण तेरा राज्यांतून पाचशे खेळाडू मुले, मुली, पंच, व्यवस्थापक, मार्गदर्शक अधिकारी सहभागी होणार आहेत. स्पर्धेसाठी जिल्हा क्रीडा संकुल येथे दोन व अंबाबाई तालीम संस्थेत दोन अशी चार सुसज्ज क्रीडांगणे तयार केली आहेत.
या स्पर्धेसाठी मुलांचे ४ व मुलींचे ४ गट करण्यात येणार असून स्पर्धा साखळी आणि बाद पध्दतीने खेळविण्यात येणार आहे. स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ १६ डिसेंबर रोजी होणार आहे. जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाने या स्पर्धेचे आयोजन केले आहे.या स्पर्धेमध्ये महाराष्ट्राच्या मुला-मुलींचे संघ सहभागी होत असून त्यांचे राष्ट्रीय स्पर्धापूर्व प्रशिक्षण शिबिर जिल्हा क्रीडा संकुल येथे सुरू आहे. महाराष्ट्राच्या मुलांच्या संघास ज्ञानेश काळे (सातारा) व मुलींच्या संघास राजेंद्र इखनकर (मुंबई) हे प्रशिक्षण देत आहेत. तसेच महाराष्ट्र राज्याच्या मुलींच्या संघ व्यवस्थापकपदी धनश्री करमरकर, तर मुलांच्या संघाच्या व्यवस्थापकपदी राजेंद्र कदम यांची नियुक्ती करण्यात आली आहे.सलग दुसºयावर्षी राष्ट्रीय स्पर्धा...क्रीडा पंढरी सांगलीस जिल्हाधिकारी वि. ना. काळम यांच्या प्रयत्नातून सलग दुसºयावर्षी शालेय राष्ट्रीय स्पर्धेचा बहुमान मिळाला आहे. २०१६ मध्ये सायकलिंग व खो-खो खेळाच्या राष्ट्रीय स्पर्धा सांगलीत झाल्या होत्या. यंदाच्यावर्षी बेसबॉल व खो-खो खेळाच्या राष्ट्रीय स्पर्धा होत आहेत. राष्ट्रीय स्पर्धांमुळे येथील क्रीडा क्षेत्रास चांगले व्यासपीठ मिळाले आहे.