सांगली : भारताला महासत्ता बनविण्यात मुस्लिमांनी बहुमोल योगदान दिले आहे. पण सध्या स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करत असताना मुस्लिमांवरील अन्यायात वाढ झाल्याची टीका मुस्लिम ओबीसी ऑर्गनायझेशनचे राष्ट्रीय अध्यक्ष इकबाल अन्सारी यांनी केली. सांगलीत जिल्हा कार्यकारिणीच्या बैठकीत ते बोलत होते. स्वत:ला धर्मनिरपेक्ष समजणारे विरोधी पक्षही कोणताही विरोध न करता मुस्लिमांवरील अन्यायाचा तमाशा बघत असून एकप्रकारे साथच देत आहेत असे ते म्हणाले.
पदाधिकारी यांना मरगळ झटकून समाजाच्या विकासाचे व्रत घेऊन कार्यरत होण्याचा सल्ला इकबाल अन्सारी यांनी दिला. ते म्हणाले, धर्मनिरपेक्ष पक्षांनी मुस्लिमांना आपली बटीक गृहीत धरले आहे. मुस्लिमांवरील अन्यायाला मूक संमती देत आहेत. त्यामुळे संघटनेची पुनर्बांधणी करण्याची गरज आहे. जातीयवादी पक्ष तसेच धर्मनिरपेक्षतेच्या आडून मुस्लिमांवर अन्याय करणाऱ्यांना धडा शिकवला पाहिजे. राज्य अध्यक्ष सादिक शेख म्हणाले, समाजात व संघटनेत एकजूट असेल, तर संघटना सक्षम बनते. यावेळी अमीन शेख यांनीही भूमिका मांडली. सूत्रसंचालन कोल्हापूर जिल्हाध्यक्ष जहांगीर हजरत यांनी केले. एम. एस. गवंडी, नासीर शरीकमसलत, अयुब बारगीर, शाहीन मुल्ला यांनीही मार्गदर्शन केले. संयोजन कबीर मुजावर, शहानवाज मुल्ला आदींनी केले.