सांगली : नाट्यपंढरी सांगलीत प्रथमच दिल्लीच्या नॅशनल स्कुल आॅफ ड्रामाचा महोत्सव होत असून त्याची तयारी आता सुरू झाली आहे. राष्ट्रीय स्तरावर गाजलेली पाच नाटके या महोत्सवात सादर होणार असल्याने येथील नाट्यरसिक, कलाकार आणि तंत्रज्ञांना ही एक सुवर्णसंधी प्राप्त झाली आहे.नॅशनल स्कुल आॅफ ड्रामा ही नाट्यक्षेत्रातील सर्वोच्च संस्था समजली जाते. एनएसडीमार्फत १९८६-८७ मध्ये नाट्यपंढरी सांगलीत एक शिबिर घेण्यात आले होते. त्याशिवाय या संस्थेचा नाट्यपंढरीत कोणताही उपक्रम आजवर झाला नव्हता.
देशपातळीवरील गाजलेल्या नाटकांचा आस्वाद नाट्यपंढरीतील रंगकर्मींना आणि रसिकांना घेता यावा यासाठी प्रथमच या संस्थेने हा उपक्रम हाती घेतला आहे.
येत्या २५ ते ३0 डिसेंबर या कालावधित दररोज सायंकाळी सात वाजता सांगलीच्या भावे नाट्यमंदिरात नाट्य महोत्सव आयोजित केला आहे.
२५ डिसेंबर रोजी मुंबईच्या रंगपीठ निर्मित मोहे पिया या हिंदी नाटकाचे सादरीकरण होणार आहे.
२६ रोजी एर्नाकुलम येथील लोकधर्मी थिएटरच्या कर्णबार या मल्याळी नाटकाचा प्रयोग होईल.
२७ रोजी थिरुअनंतपुरमच्या सोपनम संस्थेच्या शाकुंतलम या संस्कृत नाटकाचा प्रयोग होणार आहे.
२८ रोजी भोपाळ येथील विहान संस्थेमार्फत हास्य चुडामणी या हिंदी नाटकाचा प्रयोग होईल.
३0 डिसेंबरला डोंबिवलीच्या अनिहा प्रोडक्शनच्या एका गुराख्याचे महाकाव्य या नाटकाच्या प्रयोगाने महोत्सवाची सांगता होईल.सांगलीतील या महोत्सवाची तयारी आता जोरदारपणे सुरू झाल्याचे समजते. सांगलीतील काही रंगकर्मी या महोत्सवाच्या नियोजनात व्यस्त झाले आहेत. नॅशनल स्कुल आॅफ ड्रामाच्या या महोत्सवाबद्दल रंगकर्मींमध्येही उत्सुकता आणि उत्साह दिसून येत आहे.