सांगली : ‘आता उठवू सारे रान, आता पेटवू सारे रान’ या स्वातंत्र्य लढ्यातील प्रेरणादायी गीतास उजाळा देत राष्ट्र सेवा दलाचे कलापथक लोकजागरास सज्ज झाले आहे. ज्येष्ठ विचारवंत प्राचार्य डॉ. पी. बी. पाटील यांच्या ‘शक्तिपीठ’ या समाधीस्थळी झालेल्या शिबिरातून तरूणांनी लोकप्रबोधनात सहभाग वाढविण्याचा मनोदय व्यक्त केला.
समाजजागृतीसाठी व एखादा विचार रूजविण्यासाठी तो विचार मनोरंजकपणे समाजासमोर मांडणे आवश्यक असते. यासाठीच रा राष्ट्र सेवा दलात कलापथकाला विशेष महत्त्व आहे. याच कलापथकांच्या गीतांची मांडणी व सराव बुधगाव येथील सरोज उद्यानात तरूणांच्या सहभागाने पार पडला. यावेळी ‘पी. बी. आपके सपनोंको मंझील तक पहुंचाएंगे’ ही शपथ उपस्थितांनी घेत प्राचार्य पाटील यांच्या विचारांना उजाळा दिला.
राष्ट्र सेवा दलाचे राष्ट्रय संघटक सदाशिव मगदूम, दक्षिण भारत संघटक बाबासाहेब नदाफ यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम झाला. यावेळी स्वातंत्र्यसैनिक शाहीर शिवाजीराव पवार उपस्थित होते. सरोज उद्यानातील निसर्गसौंदर्याने नटलेल्या परिसरात पी. बी. पाटील व सरोज पाटील यांच्या समाधीला अभिवादन करून कार्यक्रमास सुरूवात झाली. वर्तमान काळात पुन्हा एकदा गांधीजींची गरज का, हे सांगण्यासाठी ‘बापू आजा रे’ या गीतासह प्रबोधनपर गीते सादर करण्यात आली.
प्राचार्य पी. बी. पाटील यांच्या विचार व कृतीचा वारसा त्यांचे वारसदार शिवाजी पाटील व गीता पाटील यांनी चालविला असून सर्व उपक्रमांच्या पाठीशी उभे राहण्याची ग्वाही त्यांनी दिली.पाटील यांच्या पाठबळामुळे हक्काचे ठिकाण निर्माण झाल्याची भावना तरूणांनी व्यक्त केली. यावेळी रोहित शिंदे, मिलिंद कांबळे, शाहिस्ता मुल्ला, ऐश्वर्या माने, मोहन देशमुख, शिवाजी दुर्गाडे, ऋतुजा पाटील, सीया पाटील, अभिजित जाधव आदी उपस्थित होते.महात्मा गांधींच्या स्वप्नातील समाज निर्मितीसाठी प्राचार्य पी. बी. सरांनी आयुष्यभर विचार पेरले. त्यांच्या वारसदारांकडून पुन्हा एकदा या विचारांना प्रेरणा मिळत आहे.- सदाशिव मगदूम,राष्ट्र सेवा दल.प्राचार्य पी. बी. पाटील यांचे समाधीस्थळ केवळ कुटुंबियांपुरते मर्यादित न राहता त्याचा उपयोग त्यांचे विचार पुढे घेऊन जाणाऱ्या राष्ट्र सेवा दलाच्या उपक्रमासाठी होत आहे, याचा मनस्वी आनंद होत आहे. राष्टÑ सेवा दलासाठी कुटुंबातर्फे सर्वतोपरी मदत करणार आहे.- गीता पाटील.