दत्ता पाटील ---तासगाव तालुक्यात मोठ्या अटीतटीने झालेल्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीत पुन्हा राष्ट्रवादीने बाजी मारली. माजी गृहमंत्री आर. आर. पाटील यांच्या निष्ठेशी बांधील असलेल्या मतदारांनी भाजपचा भ्रमनिरास करीत राष्ट्रवादीच्या घड्याळाची टिकटिक कायम ठेवली. जिल्हा परिषदेच्या ६ पैकी ४ जागांवर राष्ट्रवादी, २ जागांवर भाजप, तर पंचायत समितीच्या १२ पैकी ७ जागांवर राष्ट्रवादी व ५ जागांवर भाजपने यश मिळविले. पंचायत समितीचा बालेकिल्ला कायम ठेवण्यात राष्ट्रवादीला यश मिळाले.तासगाव तालुक्यात सहा जिल्हा परिषद आणि बारा पंचायत समितींसाठी भाजप आणि राष्ट्रवादीत मोठ्या चुरशीने निवडणूक झाली. मतदानाच्या क्षणापर्यंत राष्ट्रवादीतून होणाऱ्या प्रमुख कार्यकर्त्यांच्या गळतीने तालुक्यात भाजपची हवा निर्माण झाली होती. राष्ट्रवादीचे बिनीचे अनेक शिलेदार भाजपमध्ये गेल्यामुळे तासगाव तालुक्यातील राष्ट्रवादीचा बालेकिल्ला तग धरणार का? याची उत्सुकता होती.गुरुवारी सर्व जागांसाठी निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. विकास खरात यांच्या अध्यक्षतेखाली मतमोजणीस सुरुवात झाली. सर्व जागांची एकाचवेळी मतमोजणी सुरू झाली. सुरुवातीच्या चार फेऱ्यात सावळज, मणेराजुरी आणि चिंचणी गटात राष्ट्रवादीने आघाडी घेतली होती, तर मांजर्डे, येळावी, विसापूर गटात भाजपने आघाडी घेतली होती. पंचायत समितीच्या बारा जागांचा कलही समसमान दिसून येत होता. पहिल्या टप्प्यात तालुक्यात भाजप आघाडीवर असल्याचे चित्र दिसून येत होते. मात्र नंतर पुन्हा कल बदलला. चिंंचणीत भाजपने, तर विसापूर, येळावीत राष्ट्रवादीने आघाडी घेतली. पंचायत समितीतही राष्ट्रवादीने आघाडी घेतली. तालुक्यातील सहा जागांपैकी सावळज, विसापूर, येळावी आणि मणेराजुरी या चार जागांवर राष्ट्रवादीने बाजी मारली. चिंंचणीत भाजपचा, तर मांजर्डेत भाजप पुरस्कृत उमेदवार विजयी झाला. पंचायत समितीच्या बारा जागांंपैकी सावळज, वायफळे, मणेराजुरी, मांजर्डे, बोरगाव, वासुंबे, कुमठे या सात जागांवर राष्ट्रवादीने बाजी मारली. सावर्डे, विसापूर, चिंचणी या तीन जागांवर भाजपचे, तर पेड आणि येळावी या दोन जागांवर भाजप पुरस्कृत उमेदवार विजयी झाले. राष्ट्रवादीतून भाजपमध्ये प्रवेश केलेल्या नेत्यांच्या गावांतील मतदारांनी राष्ट्रवादीलाच पसंती दिली. तालुक्यातील जनतेचा कल आर. आर. पाटील यांच्या निष्ठेशी राहिल्याने पुन्हा एकदा राष्ट्रवादीची सत्ता कायम राहिली. लक्षवेधी लढत जिल्हा परिषदेसाठी जिल्ह्याचे लक्ष लागून राहिलेल्या सावळज गटातून चंद्रकांत पाटील यांनी तालुक्यात सर्वाधिक ३,६२१ इतक्या मताधिक्याने बाजी मारली, तर राष्ट्रवादीतून भाजपमध्ये प्रवेश करुन निवडणुकीच्या रिंगणात उतरलेल्या सुनील पाटील यांच्याविरोधात राष्ट्रवादीच्या अर्जुन पाटील यांनी ४८२ मतांनी बाजी मारली.निसटता पराभव पंचायत समितीच्या पेड गणातील भाजप पुरस्कृत उमेदवार वर्षा फडतरे यांनी सर्वाधिक ४ हजार ५२ मतांनी विजय मिळविला. येळावी गणातून राष्ट्रवादीचे डी. के. पाटील यांचा १३१ मतांनी, कुमठे गणातून भाजपच्या अरुणा पाटील यांचा १३३ मतांनी, तर सावर्डे गणातून राष्ट्रवादीच्या चंद्रकांत माळी यांचा ११८ मतांनी निसटता पराभव झाला.
तासगावात पुन्हा राष्ट्रवादी
By admin | Published: February 23, 2017 11:05 PM