सांगली : एकीकडे कुंकू, बांगड्या यावरील जीएसटी रद्द करून महिलांविषयीच्या धोरणाचा गाजावाजा होत असताना सॅनिटरी पॅडसवर मात्र २२ टक्के जीएसटी का लावण्यात आला आहे, असा सवाल गुरुवारी राष्ट्रवादी महिला आघाडीने व्यक्त केला. याप्रश्नी त्यांनी सांगलीत निदर्शने करीत पॅडस्वरील कर हटविण्याची मागणी केली.सांगलीच्या राष्ट्रवादीच्या जिल्हा कार्यालयासमोर राष्ट्रवादी महिला आघाडीने जोरदार निदर्शने केली. याविषयीचे निवेदन त्यांनी स्थानिक जीएसटी अधिकाऱ्यांना दिले. दिल्लीतील जीएसटी कौन्सिललाही त्यांनी एक पत्र गुरुवारी पाठविले.
यामध्ये त्यांनी म्हटले की, स्त्रियांचा सन्मान करण्याची भारतीय परंपरा आहे. सॅनिटरी पॅडस ही अत्यंत महत्त्वाची आणि गरजेची गोष्ट आहे. गेल्या काही वर्षात याचा वापर वाढला असला तरी आजही अनेक स्त्रिया पॅडस् वापरत नाहीत. सॅनिटरी पॅडस्च्या प्रचाराचा प्रयत्न केला जात असताना गेल्या कित्येक वर्षात याचे दर कमी झाले नाहीत.
पॅडस्वर सध्या २२ टक्के जीएसटी लावण्यात आला आहे. यामागे जीएसटी परिषदेची नेमकी भूमिका काय आहे? महिलांच्या हिताचे आणि सन्मानाचे धोरण राबविले जात असल्याचा गाजावाजा होत असताना अशाप्रकारे महिलांच्या गरजेच्या वस्तुवर मोठ्या प्रमाणावर कर लादल्याने हा विरोधाभास वाटतो.
स्त्रियांच्या वेदनेचा वापर तिजोऱ्या भरण्यासाठी करण्यात येऊ नये. उत्पन्न वाढीचे अन्य मार्ग सरकारने शोधावेत. त्यामुळे शासनाने तातडीने सॅनिटरी पॅडस्वरील जीएसटी शून्य टक्के करावा, अशी मागणी यामध्ये करण्यात आली आहे.महिला आघाडीच्या अध्यक्षा विनया पाठक यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले. आंदोलनात जिल्हा उपाध्यक्षा राधिका हारगे, शहराध्यक्षा अनिता पांगम, मिरज शहराध्यक्षा वंदना चंदनशिवे, सुनीता लालवानी, मोनिका तांदळे, रंचल मगदुम, सुरेखा मासाळ, संगीता मासाळ, वंदना कुलकर्णी, काजल आहुजा आदी सहभागी झाल्या होत्या.