अशोक पाटील ।इस्लामपूर : आमदार जयंत पाटील यांना प्रदेशाध्यक्षपद मिळाले आणि इस्लामपूर मतदारसंघात पुन्हा राष्ट्रवादीला ऊर्जा मिळाली. इस्लामपूर पालिकेनंतर जिल्हा परिषद, सांगली महापालिकेत राष्ट्रवादीला बसलेला झटका आमदार पाटील यांच्या जिव्हारी लागला आहे. त्यामुळे राज्यात दौरा करून कार्यकारिणीत बदल केले. स्वत:च्या घरातच फुलत असलेले भाजपचे कमळ खुडण्याचा डाव राष्ट्रवादीने आखला आहे.
इस्लामपूर मतदारसंघात आष्टा, वाळवा आणि परिसरातील गावे महत्त्वाची मानली जातात. माजी आमदार विलासराव शिंदे यांचा गट येथे कार्यरत आहे. त्यामुळे आमदार पाटील यांनी या गटाला जपले आहे. मात्र वैभव शिंदे यांच्यारूपाने राष्ट्रवादीला धक्का बसला आहे. कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी या परिसरात पाय रोवण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. यावर उपाय म्हणून आ. पाटील यांनी विलासराव शिंदे यांचे जिल्हाध्यक्षपद कायम ठेवले आहे.
अशीच परिस्थिती माजी मंत्री अण्णासाहेब डांगे यांच्या गटात आहे. डांगे यांची ताकद पाहता, आमदार पाटील यांनी अॅड. चिमण डांगे यांच्यावर राज्याच्या चिटणीसपदाची जबाबदारी देऊन धनगर समाजातील युवा संघटन मजबूत करण्याचा प्रयत्न केला आहे.
हुतात्मा संकुलाची वेगळी ताकद नेहमीच आमदार पाटील यांच्याविरोधात गेली आहे. तिला थोपविण्यासाठी राजारामबापू पाटील यांच्याशी एकनिष्ठ असलेले जिल्हा बँकेचे अध्यक्ष दिलीपराव पाटील यांना अनेक पदांवर आ. पाटील यांनी संधी दिली आहे. आताही राष्ट्रवादीच्या सरचिटणीस पदावर त्यांची नियुक्ती केली आहे. त्यांचे पुत्र संग्राम यांच्यावर वाळवा तालुका राष्ट्रवादी युवकच्या अध्यक्षपदाची जबाबदारी देऊन, खोत आणि वैभव शिंदे यांची ताकद कमी करण्याचा प्रयत्नही चालवला आहे.त्यांच्याच मतदार संघात फुलत असलेले भाजपचे कमळ खुडून टाकण्यासाठी आ. पाटील यांची ही खेळी आहे.
प्रदेशाध्यक्षपद मिळाल्यानंतर राज्यातील काही भागात दौरा केला. तेथील पदाधिकारी, कार्यकर्ते यांच्याशी चर्चा केली. त्यानंतर विविध समाजातील घटकांना न्याय देऊन, जिल्हाध्यक्षापासून कार्यकारिणीत बदल केले आहेत. राज्य कार्यकारिणी सर्वसामान्यांचे प्रश्न मार्गी लावले. राज्यात अठरा हजार कार्यकर्त्यांच्या बुथ कमिट्या तयार करून त्या नोंदणीकृत केल्या आहेत. त्यामुळे आगामी काळात राष्ट्रवादी पक्ष प्रथम क्रमांकावर येईल.- आ. जयंत पाटील, प्रदेशाध्यक्ष, राष्ट्रवादी