युनूस शेख
इस्लामपूर : इस्लामपूर विधानसभा मतदारसंघातील अत्यंत चुरशीने झालेल्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी सलग आठव्या विजयाची नोंद केली. मात्र यावेळी त्यांना अवघ्या १३ हजार २७ इतक्या मताधिक्यावर समाधान मानावे लागले. राष्ट्रवादी अजित पवार गटाचे उमेदवार निशिकांत भोसले-पाटील यांनी अत्यंत चिवट झुंज देताना जयंतरावांच्या बालेकिल्ल्यावर धडक मारू शकतो, असा संदेशही दिल्याचे स्पष्ट झाले. या निवडणुकीत इतर १० उमेदवारांची अनामत रक्कम जप्त झाली.आमदार जयंत पाटील यांच्या मुत्सद्देगिरीसमोर अनेक विरोधकांचे पानिपत झाले असताना निशिकांत पाटील यांनी दुसऱ्यावेळी अत्यंत ताकदीने त्यांच्याविरोधात उभे राहून एकच खळबळ उडवून दिली होती. एकतर्फी वाटणारी निवडणूक निशिकांत पाटील यांच्या उमेदवारीमुळे चुरशीची रंगली. ५० हजारांपासून पुढे ८५ हजारांपर्यंत मताधिक्य घेण्याचा जयंत पाटील यांचा पायंडा यावेळी निशिकांत पाटील यांनी मोडीत काढला. त्यामुळे जयंत पाटील यांना तब्बल २१ फेऱ्यांच्या मोजणीनंतर १३ हजार २७ इतक्या मताधिक्यापर्यंत विजयासाठी खाली आणण्यात निशिकांत पाटील यशस्वी ठरले.तालुक्यात जयंत पाटील यांच्याकडे संस्था, संघटना आणि कार्यकर्त्यांचे प्रचंड मोठे जाळे आहे. त्या तुलनेत निशिकांत पाटील यांच्याकडे तोकडी ताकद होती. मात्र त्यांनी आपल्या सवंगड्यांना सोबत घेत प्रचाराचा धुरळा उडवून दिला. जयंत पाटील यांच्याविरोधी जाहीर सभांमधून आरोप करतानाच सोशल मीडियावरही निशिकांत पाटील यांनी आक्रमक प्रचार यंत्रणा राबवली होती.जयंत पाटील यांच्या ३५ वर्षांच्या कारकिर्दीचा पंचनामा करताना निशिकांत पाटील यांनी ऊसदर, मतदारसंघातील विकास कामे, बेरोजगारी, समाजासाठी गरजेचा असणारा मूलभूत विकास, पाणंद रस्ते अशा अनेक विषयांवरून नॅरेटीव्ह तयार करत जयंत पाटील यांना घेरण्याचा प्रयत्न केला. मात्र जयंत पाटील यांनी आरोपांवर बोलण्याचे टाळत राज्यसरकारच्या कारभारावर, भ्रष्टाचारावर आणि योजनांवर आरोपाच्या फैरी झाडत राज्यात महाविकास आघाडीचेच सरकार येणार असल्याचे सांगत मतदारांचा विश्वास संपादन करण्याचा प्रयत्न केला.आ. जयंत पाटील यांनी तालुक्यातील विरोधकांची ताकद नेहमीच दुबळी राहील, अशा पद्धतीने आपल्या राजकारणाची वाटचाल ठेवली होती. प्रत्येक निवडणुकीत मतविभाजन होईल याची खबरदारी ते नेहमीच घेत होते. मात्र यावेळी पहिल्यांदाच त्यांनी असा कोणताही प्रयत्न न करता विरोधकांची ताकद जोखण्याचा डाव खेळला. त्यांच्या या खेळीमुळे इस्लामपूर मतदारसंघातील खरे राजकीय वास्तव समोर आले.
पराभूत उमेदवार
- निशिकांत भोसले-पाटील (राष्ट्रवादी अजित पवार गट) - ९६,८५२
- अमोल कांबळे (बसपा) - ७०४
- राजेश गायगवाने (वंचित आघाडी) - ९९४
- सतीश इदाते (रासप) - १९४
- नोटा - १०४२
जयंत पाटील (राष्ट्रवादी शरद पवार) - १०९८७९विजयाची तीन कारणे
- संस्था आणि संघटनेतून कामगार व कार्यकर्त्यांची मोठी ताकद
- विरोधकांच्या आरोपांना बेदखल करत राज्य सरकारवर टीकेची झोड
- नियोजनबद्ध प्रचार आणि साम, दाम, दंड, भेदाची नीती.
निशिकांत पाटील यांच्या पराभवाची कारणे
- विरोधकांची मोट बांधली; मात्र कामी आली नाही.
- प्रचाराचे रान उठवण्यात यश मात्र मतांची बेरीज चुकली.
- शेवटच्या दोन दिवसांत यंत्रणेत आलेला विस्कळीतपणा.
जयंतरावांच्या चिरेबंदी वाड्याला धक्केइस्लामपूर विधानसभेच्या अटीतटीने झालेल्या निवडणुकीत यावेळी पहिल्यांदाच विरोधी उमेदवाराने मोठी टक्कर दिल्याचे स्पष्ट झाले. आमदार जयंत पाटील यांच्या विजयामध्ये इस्लामपूर शहराने सात हजारांहून अधिक मतांचे आधिक्य दिले. कृष्णा नदीकाठच्या काही गावांतून निसटते मताधिक्य मिळाले. मात्र ज्या आष्टा शहरावर त्यांची भिस्त होती, त्या शहराने मात्र निराशा केली. मिरज तालुक्यातील आठ गावांमध्येही निशिकांत पाटील यांनी आघाडी घेतली. त्यामुळे जयंतरावांचा चिरेबंदी वाड्याला पहिल्यांदाच धक्के बसल्याचे चित्र समोर आले.