इस्लामपूर : येथील बस स्थानकावर सोमवारी सकाळी राष्ट्रवादीच्या एका युवा कार्यकर्त्याने उद्दामपणाचा कळसच गाठला. ज्या ठिकाणी बसची ये-जा सुरु असते, तेथेच आपली चारचाकी गाडी लावून तो एका महिलेला बसमध्ये बसविण्यासाठी गेला होता. गाडी बाजूला काढण्याबाबत एसटी चालक, वाहकांनी विनंती केली. परंतु कोणाचाही मुलाहिजा त्या युवकाने ठेवला नाही.सकाळी ९.१५ च्या सुमारास सर्वच फलाटांवर कोल्हापूर, सांगली, तासगाव, विटा, कऱ्हाडकडे जाणाऱ्या बसेस लागल्या होत्या. दिवाळीची सुटी संपल्याने माघारी जाणाऱ्या चाकरमान्यांची मोठी गर्दी बस स्थानकात होती. अशा गर्दीच्या ठिकाणीच राष्ट्रवादीच्या एका युवा कार्यकर्त्याने आपली चारचाकी गाडी (क्र. एमएच १२-एच. एल.-0८१७) कोल्हापूर बसेसच्या फलाटावर लावली.
याठिकाणी गाडी लावण्यास परवानगी नसतानाही, संबंधित युवकाने हा उद्दामपणा केला. त्यावर येथील वाहतून नियंत्रक दीपक यादव यांनी, येथून गाडी काढा व पार्किंगची व्यवस्था केली आहे, तेथे लावा, अशी विनंती त्याला केली. यावर त्याने यादव यांच्यासोबत वाद घातला. त्यानंतर त्याने आपली गाडी ताकारी, ऐतवडे खुर्द, वारणानगर भागाकडे जाणाऱ्या बसेस जेथे लागतात, तेथे लावली.
काही वेळाने सांगलीकडे जाणारी बस फलाटावर लागताच, त्याने त्याची गाडी बरोबर बसच्या मागील बाजूस लावली. फलाटावरुन बस मागे घेताना या गाडीचा अडथळा येत होता. त्यामुळे पुन्हा संबंधित युवकास वाहकाने, गाडी बाजूला घ्या, अशी विनंती केली.यावेळी मात्र हा युवकाने कहरच केला. त्याने वाहकालाच दमबाजी केली. माझ्या गाडीवर बस घाल. तुझ्याकडून डबल पैसे वसूल करण्याची धमक माझ्यात आहे, असा दम दिला. शेवटी स्वत:च्या गाडीतील महिलेला बसमध्ये बसवूनच या उद्दाम युवकाने आपली गाडी बाजूला काढून निघून गेला. तेथे उपस्थित असलेले सर्वच प्रवासी हा प्रकार पाहतच राहिले.ही चारचाकी (क्र. एमएच १२-एच. एल.-०८१७) अचानक बसस्थानक आवारात आली. त्याने कोल्हापूरच्या बस लागतात त्या फलाटावरच आपली गाडी उभी केली होती. त्याला गाडी काढण्यासाठी विनंती केली, तरीसुध्दा त्याने उद्दापणाचा कळस गाठला. यानंतरही त्याने पुन्हा बसच्या मागील बाजूस आपली गाडी उभी करून वाहतुकीला अडथळा निर्माण केला.दीपक यादव, वाहतूक नियंत्रक, इस्लामपूर आगार.