सांगली : पर्यावरण रक्षणाचा संदेश देत सांगलीतील निसर्गरंग फौंडेशनकडून सलग तिसऱ्या वर्षीही सांगली ते पंढरपूर अशी 'निसर्गराया भेटूया चला विठ्ठल पेरूया' या निसर्गवारीची सुरवात झाली आहे. या निसर्गवारी दरम्यान १ हजार वृक्षांचे रोपणही केले जाणार आहे.निसर्गरंग फौंडेशनकडून गेल्या तीन वर्षांपासून ही निसर्गवारी सायकल रॅली पंढरपूर पर्यंत काढली जाते. यामध्ये सांगली ते पंढरपूर या मार्गावर रस्त्याच्या दुतर्फा १ हजार वृक्ष लावले जाणार आहेत. निसर्ग रक्षण आणि वृक्षारोपण याचा संदेश देत सांगलीतून निघालेली ही निसर्गवारीची आषाढी एकादशीच्या पूर्व संध्येला पंढरपूर मध्ये पोहचणार आहे.
सोमवारी सांगलीच्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यापासून प्रांताधिकारी डॉ. विकास खरात आणि तहसीलदार शरद पाटील यांच्या उपस्थितीत या निसर्गवारीला सुरवात झाली. सांगली जिल्हा सुधार समितीचे अध्यक्ष अमित शिंदे यांनी निशाणी दाखवत या निसर्गवारीला सुरवात केली. या निसर्गवारीत निसर्गरंग फौंडेशनबरोबर सांगली सायकल क्लबच्या पदाधिकाऱ्यांनी सुद्धा सहभाग घेतला आहे. सामाजिक कार्यकर्ते आणि निसर्गरंग फौंडेशन चे अध्यक्ष कुलदीप देवकुळे यांनी या उपक्रमाचे आयोजन केले आहे.