सांगली/आष्टा : नागाव (ता. वाळवा) येथील कृष्णात अण्णासाहेब शिसाळे (वय ३८) यांच्या खून प्रकरणातील मुख्य संशयित अमोल खंडेराव पाटील (३७) याची पत्नी स्वप्ना (२८) ही शनिवारी पहाटे चारपासून बेपत्ता झाली आहे. त्यामुळे या खुनाला वेगळीच कलाटणी मिळाली आहे. दरम्यान, संशयित अमोल पाटील यास आष्टा पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. शिसाळे यांच्यावर हल्ला करताना तो जखमी झाल्याने त्यास उपचारार्थ सांगलीतील एका खासगी रुग्णालयात दाखल केले आहे.अनैतिक संबंधाच्या संशयावरून शिसाळे यांचा धारदार शस्त्राने हल्ला करून निर्घृण खून करण्यात आला होता. नागाव-ढवळी रस्त्यावर उसाच्या शेतात ही थरारक घटना घडली होती.शिसाळे यांचे किराणा मालाचे दुकान आहे. दुकानाशेजारी संशयित अमोल पाटील याचे घर आहे. शिसाळेचे आपली पत्नी स्वप्नाशी अनैतिक संबंध आहेत, असा पाटील यास संशय होता. यातून त्याने पत्नीसह शिसाळेला अनेकदा समज दिली होती; पण संशयाचे भूत त्याच्या डोक्यातून गेले नाही. यातून त्याने शिसाळे यांचा खून केला. रात्री उशिरा त्यास पकडण्यात यश आले. त्याच्या हातालाही दुखापत झाली होती. पोलिसांनी त्याला उपचारार्थ सांगलीत गारपीर चौकातील खासगी रुग्णालयात दाखल केले आहे. याठिकाणी पोलीस बंदोबस्त तैनात केला आहे. डॉक्टरांनी डिस्चार्ज दिल्यानंतर त्याला अटक केली जाईल, असे पोलीस निरीक्षक शौकत जमादार यांनी सांगितले.रविवारी पहाटे चार वाजता संशयित पाटील यांचे बंधू विजय लघुशंकेसाठी उठले होते. त्यावेळी पाटील यांची पत्नी स्वप्ना घरात नसल्याचे लक्षात आले. त्यांनी घरात सर्वत्र शोध घेतला, पण ती सापडली नाही. गावात तसेच नातेवाईकांकडे चौकशी केली; मात्र तिचाकुठेच सुगावा लागला नाही. तीबेपत्ता असल्याची फिर्याद विजय पाटील यांनी आष्टा पोलीस ठाण्यात दिली आहे. तिच्या बेपत्ता होण्यामुळे या खुनाला वेगळीच कलाटणी मिळाली आहे. पोलिसांनी तिच्या नातेवाईकांना चौकशीच्या फेऱ्यात घेतले आहे.शिसाळेंवर ५८ वारशिसाळे यांच्या मृतदेहाची आष्ट्यातील ग्रामीण रुग्णालयात उत्तरीय तपासणी करण्यात आली. यामध्ये त्यांच्या छातीवर, चेहºयावर, हातावर, मांडीवर, गळ्यावर ५८ वार केले असल्याचे स्पष्ट झाले आहे. चाकूसारख्या धारदार शस्त्राने हे वार केल्याचा संशय आहे. संशयित पाटील यास अजून अटक केली नसल्याने, कोणत्या हत्याराचा वापर केला, हे निश्चित सांगता येणार नाही, असे पोलिसांनी सांगितले. मध्यरात्री शिसाळे यांचा मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. त्यानंतर त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
नागाव खून प्रकरणातील संशयिताची पत्नी बेपत्ता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 19, 2018 11:54 PM