सांगली : गेल्या वर्षभरापासून नक्षलवाद्यांच्या कारवाया रोखणे, त्यांना चोख प्रत्युत्तर देण्याची धडक मोहीम सुरु आहे. नक्षलवाद्यांचा कोणताही हेतू साध्य करु दिला नाही. यामुळे त्यांनी गडचिरोलीत वैफल्यातून भूसुरुंग स्फोट घडविला आहे, असे मत गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी रविवारी सांगलीत पत्रकारांशी बोलताना व्यक्त केले. नक्षलवाद्यांच्या कारवाया रोखण्यासाठी सुरु असलेल्या मोहिमेंतर्गत गेल्या वर्षभरात ५५ जणांना अटक केली आहे. ४८ नक्षलवादी शरण आले आहेत. ३७ नलक्षवाद्यांना पोलिसांनी कंठस्नान घातले आहे. त्यांच्या कारवायांवर पोलीस नियंत्रण ठेवून आहेत. यापुढे त्यांच्यावर कडक कारवाई केली जाईल. आजच्या स्फोटामुळे पोलिसांना धक्का बसला आहे. त्यांचे मनोधर्य खचू दिले जाणार नाही. (प्रतिनिधी) बागणीजवळ अपघात; १ ठार आष्टा : आष्टा-वडगाव रस्त्यावर बागणीनजीक वाळूच्या ट्रकने मोटारसायकलस्वारास चिरडले. वाळूच्या ट्रकने तीन वाहनांना जोरदार धडक दिली. यामध्ये कुलदीप आप्पासाहेब कोळी (वय ३०, रा. खोची, ता. हातकणंगले) हा तरुण जागीच ठार झाला. अपघातानंतर काही काळ वाहतूक विस्कळीत झाली होती. दुतर्फा वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. गर्दीमुळे दुपारी चारपासून सायंकाळी सहापर्यंत वाहतूक ठप्प होती. घटनास्थळावरून व आष्टा पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, आष्ट्याहून वडगावकडे वाळूने भरलेला ट्रक (एमएच ०९, एल ३४४७) निघाला होता. हा ट्रक बागणीजवळ सराफदार मळ्यानजीक आला असताना चालकाचे ट्रकवरील नियंत्रण सुटले. त्यामुळे पहिल्यांदा या ट्रकने समोरून वडगावहून आष्ट्याकडे येणार्या वाळूच्या मोकळ्या ट्रकला (एमएच १३, बी ४८३३) धडक दिली. त्यानंतर मारुती व्हॅन (एमएच ४५, ए १८०८) ला धडक दिली. दोन्ही वाहनांना धडक देऊन ट्रक पुढे गेला आणि समोरून येणार्या मोटारसायकल (क्र. एमएच ०९, सी आर ३१६८)ला जोरदार धडक दिली. ही धडक एवढी जबरदस्त होती की, यामध्ये डोक्याला मार लागल्याने कुलदीप आप्पासाहेब कोळी हा जागीच ठार झाला. अपघातग्रस्त दोन्ही ट्रकही त्याठिकाणी थांबले होते. अचानक घडलेल्या या घटनेने अपघातग्रस्त ट्रकचालकही भांबावले होते. यामध्ये त्यांना कुठेही दुखापत झाली नाही. धडक दिल्याने वाहनांचे काही प्रमाणात नुकसान झाले. अपघातानंतर या रस्त्यावरील वाहतूक विस्कळीत झाली. रस्त्याच्या दोन्ही बाजूला वाहनांच्या मोठ्या रांगा लागल्या होत्या. सुमारे दोन ते अडीच तास वाहतूक ठप्प होती. पोलीस निरीक्षक पी. डी. पोमण, पोलीस उपनिरीक्षक पिरजादे, भूषण महाडिक, आर. के. कदम, बी. एस. खोत, पांडुरंग पाटील यांनी घटनास्थळी भेट देऊन घटनेचा पंचनामा केला. विस्कळीत झालेली वाहतूक पूर्ववत केली. (वार्ताहर)
नक्षलवाद्यांचा हल्ला वैफल्यातून : आर. आर. पाटील
By admin | Published: May 12, 2014 12:03 AM