सांगली : राष्ट्रवादीचा कार्यकर्ता नालसाब मुल्ला याच्या खून प्रकरणात पोलिस तपासातून नवनवीन माहिती समोर येत आहे. मुल्ला याच्यावर हल्ला करण्यापूर्वी हल्लेखोरांनी दंडोबा डोंगर परिसरात पिस्तुलातून गोळ्या चालविण्याचा सराव केला होता. या खून प्रकरणातील मुख्य सूत्रधार सचिन विजय डोंगरे याने कळंबा कारागृहात असताना वापरलेला एक मोबाइलही पोलिसांनी जप्त केला आहे. तर डोंगरे याने दुसरा एक मोबाइल कारागृहातच जाळून टाकल्याचेही तपासात स्पष्ट झाले आहे.शनिवार, दि. १७ रोजी गुलाब कॉलनी परिसरात नालसाब मुल्ला याच्यावर गोळ्या झाडून व तलवारीने वार करून खून करण्यात आला होता. या खून प्रकरणात आतापर्यंत मुख्य सूत्रधार सचिन डोंगरेसह सनी सुनील कुरणे (रा. जयसिंगपूर), विशाल सुरेश कोळपे (रा. लिंबेवाडी, ता. कवठेमहांकाळ), स्वप्नील संतोष मलमे, रोहित अंकुश मंडले, प्रशांत उर्फ बबलू संभाजी चव्हाण (तिघेही रा. खरशिंग, ता. कवठेमहांकाळ) आणि ऋत्विक बुद्ध माने (रा. कोकळे, ता. कवठेमहांकाळ) यांना अटक करण्यात आली आहे.पिस्तुलाचा वापर करताना गडबड होऊ नये, यासाठी हल्लेखोरांनी दंडोबा डोंगर परिसरात निर्जन ठिकाणी फायरिंगचा सराव केला होता, अशी माहिती त्यांनी तपासादरम्यान पोलिसांना दिली आहे.सर्वांच्या संपर्कातमोक्का अंतर्गत कळंबा कारागृहात असलेल्या सचिन डोंगरे याने कारागृहातही मोबाइलचा वापर केल्याचे तपासात समोर आले होते. हल्ला करण्याअगोदर तो सर्वांच्या संपर्कात होता. यासाठी वापरण्यात आलेला एक मोबाइल जप्त करण्यात आला आहे. पोलिस निरीक्षक संजय मोरे या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.
राष्ट्रवादीचा कार्यकर्ता नालसाब मुल्ला खून: हल्लेखोरांचा दंडोबा डोंगरात फायरिंगचा सराव
By ऑनलाइन लोकमत | Published: July 01, 2023 4:04 PM