सांगली : राष्ट्रवादीचा कार्यकर्ता नालसाब मुल्ला याच्या खूनप्रकरणी आणखी तिघांना विश्रामबाग पोलिसांनी अटक केली. रोहित अंकुश मंडले, प्रशांत ऊर्फ बबलू संभाजी चव्हाण (दोघेही रा. खरशिंग, ता. कवठेमहांकाळ) आणि ऋत्विक बुद्ध माने (रा. कोकळे, ता. कवठेमहांकाळ) अशी संशयितांची नावे आहेत. मोकाअंतर्गत कळंबा कारागृहात असलेला सचिन विजय डोंगरे (रा. गुलाब कॉलनी, सांगली) याने हा कट रचल्याचेही निष्पन्न झाले आहे.या खून प्रकरणात सनी सुनील कुरणे (रा. जयसिंगपूर), विशाल सुरेश कोळपे (रा. लिंबेवाडी, ता. कवठेमहांकाळ) आणि स्वप्निल संतोष मलमे (रा. खरशिंग, ता. कवठेमहांकाळ) यांना यापूर्वीच अटक करण्यात आली आहे.शनिवार, दि. १७ रोजी शंभरफुटी रोडजवळील गुलाब कॉलनी परिसरात नालसाब मुल्ला याच्यावर गोळ्या झाडून व तलवारीने वार करून खून करण्यात आला होता. पोलिसांनी तत्काळ तपास करत यात एका अल्पवयीन मुलासह चौघांना ताब्यात घेतले होते. यातील तिघांना न्यायालयासमोर हजर केले असता, त्यांना पाच दिवसांची पोलिस कोठडी देण्यात आली होती. यात त्यांनी आणखी तिघांची नावे सांगितली. त्यानुसार त्यांना अटक करण्यात आली आहे. त्यांना न्यायालयाने दोन दिवसांची पोलिस कोठडी दिली आहे.खुनाचा कट रचणारा सचिन डोंगरे हा सध्या कळंबा कारागृहात असून, त्याला चौकशीसाठी ताब्यात घेतले जाण्याची शक्यता आहे. विश्रामबागचे निरीक्षक संजय मोरे, कवठेमहांकाळचे जितेंद्र शहाणे, सहायक निरीक्षक अमितकुमार पाटील, नागेश मासाळ, संदीप साळुंखे, आर्यन देशिंगकर आदींच्या पथकाने ही कारवाई केली.
तिघेही घटनास्थळी हजरपोलिसांनी अटक केलेले तिघेही खून झाला त्यावेळी त्याच ठिकाणी थांबले होते. हल्लेखोरांवर जर प्रतिहल्ला झालाच तर तो रोखण्यासाठी ते पुढे येणार होते.