सांगली : शहरातील बाबा ग्रुपचा प्रमुख आणि राष्ट्रवादीचा कार्यकर्ता नालसाब मौलाअली मुल्ला याच्या खून प्रकरणात त्याचा मामेभाऊ मुनील अल्लाकबीर मुल्ला (वय ३२, रा. मिरज, औद्योगिक वसाहत) याला पोलिसांनी अटक केली आहे. त्याने मुख्य सूत्रधार सचिन डोंगरेसह संशयितांना मदत केल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. पोलिसांनी मुनील मुल्ला याला न्यायालयात हजर केले असता ६ नोव्हेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.याबाबत अधिक माहिती अशी की, नालसाबचा साथीदार असलेला सचिन डोंगरे याच्यावर २०१९ मध्ये मोक्कातंर्गत कारवाई करण्यात आली होती. त्यातून जामीन मिळवण्यासाठी नालसाब मदत करत नसल्याच्या रागातून डोंगरे याच्या सांगण्यावरून नालसाब याचा खून करण्यात आला. पोलिसांनी खून प्रकरणी अकरा जणांना अटक केली होती.
टोळीवर अनेक स्वरूपाचे गुन्हे असल्यामुळे मोकातंर्गत प्रस्ताव पोलिस अधीक्षक डॉ. बसवराज तेली पाठवला होता. या टोळीची वाढती गुन्हेगारी मोडीत काढण्यासाठी हा प्रस्तावत तातडीने कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक सुनील फुलारी मंजूर केला. त्यानंतर हा तपास उपाधीक्षक अण्णासाहेब जाधव यांच्याकडे वर्ग करण्यात आला. त्यानुसार जाधव यांनी पुन्हा न्यायालयाच्या परवानगीने ताबा घेतला आहे. संशयितांची कसून चौकशी करण्यात आली. त्यात नालसाब मुल्ला याचा मामेभाऊ मुनील मुल्ला याचाही समावेश असल्याचे समोर आले. पोलिसांनी सखोल चौकशी करून त्यालाही ताब्यात घेतले.
दरम्यान, गुंड सचिन विजय डोंगरे, स्वप्नील संतोष मलमे (रा. खरशिंग, ता. कवठेमहांकाळ), सनी सुनील कुरणे (शाहुनगर, जयसिंगपूर, ता. शिरोळ, जि. कोल्हापूर), विशाल सुरेश कोळपे (लिंबेवाडी, रांजणी, ता. कवठेमहांकाळ), सचिन विजय डोंगरे (गुलाब कॉलनी, शंभर फुटी रस्ता, सांगली), प्रशांत उर्फ बबलू संभाजी चव्हाण, रोहित अंकुश मंडले (दोघे रा. खरशिंग, ता. कवठेमहांकाळ), ऋतिक बुद्ध माने (कोकळे, ता. कवठेमहांकाळ), विक्रम तमान्ना घागरे (ढालगाव, ता. कवठेमहांकाळ), प्रवीण अशोक बाबर (रा. आलेगाव, ता. सांगोला, जि. सोलापूर), अक्षय बाळासो शेंडगे (रा. कलानगर, सांगली), अवधुत सुनील पानबुडे (रा. नळभाग सांगली) या अकरा जणांना यापूर्वीच अटक करण्यात आली होती. आता मुल्ला याच्या अटकेनंतर खळबळ उडाली आहे.