पलूस, कडेगाव, कवठेमहांकाळचे सर्व अर्ज वैधसांगली : जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या ६० जागांसाठी दाखल झालेल्या ७८४ पैकी २१, तर पंचायत समितीच्या १२० जागांसाठी दाखल झालेल्या १३०६ पैकी २६ अर्ज मंगळवारी छाननीत अवैध ठरले. तासगाव तालुक्यातील मांजर्डे गटातील राष्ट्रवादीचे उमेदवार प्रभाकर पाटील, येळावी गणातील काँग्रेसचे अमित ऊर्फ विशाल पाटील यांचे अर्ज बाद झाले. तासगावात भाजपचे आठ अर्ज कोऱ्या एबी फॉर्ममुळे बाद झाले, तर मिरज आणि जत तालुक्यातही त्यांचे पाच अर्ज अवैध ठरले. छाननीवेळी विरोधी गटाने हरकत घेतल्याने मांजर्डेत राष्ट्रवादीचे जिल्हा परिषदेचे उमेदवार प्रभाकर पाटील आणि येळावीतील काँग्रेसचे पंचायत समितीचे उमेदवार अमित ऊर्फ विशाल पाटील यांचा अर्ज बाद झाला. त्यामुळे मांजर्डेत राष्ट्रवादीला, तर येळावीत काँग्रेसला धक्का बसला आहे. भाजपचे आठ अर्ज कोऱ्या एबी फॉर्ममुळे बाद झाले.वाळवा तालुक्यात जिल्हा परिषद गटातील दोन, तर पंचायत समिती गणातील दोन असे चार अर्ज अवैध ठरले. बोरगाव गण आणि बागणी जिल्हा परिषद गटातून प्रत्येकी एक हरकत दाखल झाल्याने, त्यावरील निर्णय बुधवारी दिला जाणार आहे. रेठरेहरणाक्ष गणातील राष्ट्रवादीचे अधिकराव लोहार व काँग्रेसचे बोरगाव गणातील अर्जुन खरात या दोघांचे अर्ज जातीचा दाखला नसल्याच्या कारणावरुन अवैध ठरले. बागणी जिल्हा परिषद गटातून अपक्ष उमेदवार अमित जाधव यांनी शिवसेनेचे उमेदवार भूषण भासर शासकीय थकबाकीदार असल्याचा आक्षेप घेतला. त्यामुळे भासर यांचा अर्ज अवैध ठरला.मिरज तालुक्यातील छाननीत ३४० पैकी नऊ जणांचे अर्ज अवैध झाले. एरंडोलीतील काँग्रेस बंडखोर संगीता खुळे यांचा भाजपकडून भरलेला अर्ज एबी फॉर्म नसल्याने अवैध ठरला. अपक्ष म्हणून त्यांचा दुसरा अर्ज वैध ठरला आहे. इनामधामणी पंचायत समिती गणातील भाजपच्या त्रिशला खवाटे यांचाही अर्ज अवैध ठरल्यामुळे भाजपला धक्का बसला आहे. शिराळा तालुक्यातील पंचायत समितीचे दोन, तर जिल्हा परिषद गटाचा एक अर्ज अवैध झाला. वाकुर्डे गटामध्ये आरपीआयचे उमेदवार प्रियांका कांबळे यांचा जातीचा दाखला नसल्याने अर्ज अवैध झाला. मांगले गणामध्ये भाजपच्या उमेदवार श्रीदेवी मोहिते यांनीही अर्जासोबत जातीचा दाखला न जोडल्यामुळे त्यांचा अर्ज अवैध ठरविला.खानापूर तालुक्यातील नागेवाडी जिल्हा परिषद गटातील कॉँग्रेस व राष्ट्रवादी आघाडीच्या अपक्ष उमेदवार सौ. शिवानी देशमुख यांचा एकमेव उमेदवारी अर्ज अवैध झाला. आटपाडी तालुक्यातील जिल्हा परिषद तीन आणि पंचायत समितीचे तीन अर्ज बाद झाले आहेत. परंतु, या सर्व उमेदवारांचे दुसरे अर्ज वैध ठरल्यामुळे ते निवडणुकीच्या मैदानात आहेत. जत तालुक्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समितीचे प्रत्येक आठ अर्ज अवैध ठरले आहेत. भाजपचे डफळापूर पंचायत समिती गणाचे सुभाष गायकवाड व रणजित चव्हाण आणि कोसारी गणाचे उमेदवार मनीषा कोंडिगिरे यांचे अर्ज अवैध ठरल्यामुळे आ. विलासराव जगताप गटाला धक्का बसला आहे. राष्ट्रवादीच्या माडग्याळ गणाच्या सुनीता वाघमारे यांचाही अर्ज बाद झाला. (प्रतिनिधी)
राष्ट्रवादी, भाजप, काँग्रेसला धक्का
By admin | Published: February 08, 2017 12:07 AM