इस्लामपूर (जि. सांगली) : कोरोनाबाधित कंटेन्मेंट झोनमधील बिअर बारमधून चोरट्या पद्धतीने दारू काढून त्याची नगरपालिकेच्या कचरा घंटागाडीतून वाहतूक करण्यास प्रोत्साहन देणारा राष्ट्रवादीचा नगरसेवक खंडेराव जाधव विवारी पहाटे शाहूवाडी तालुक्यातील आंबा येथे पोलिसांच्या जाळ्यात सापडला. गुन्हेगारी पार्श्वभूमी असणारा जाधव गेल्या १३ दिवसांपासून पोलिसांना चकवा देत होता.बारमधून होणाऱ्या चोरट्या दारू वाहतुकीविरुद्ध स्थानिक नगरसेवक अमित ओसवाल यांनी मुख्याधिकारी प्रज्ञा पवार यांच्याकडे तक्रार केली होती. त्यावर पवार यांनी कारवाई करण्यासाठी पोलिसांना पत्र दिले होते. ही कारवाई टाळण्यासाठी रागाच्या भरात पालिकेत आलेल्या खंडेराव जाधव याने मुख्याधिकारी पवार यांच्या केबिनमध्ये घुसून खुर्ची उचलून त्यांना मारण्याचा प्रयत्न केला. तसेच अर्वाच्च शिवीगाळ करत त्याने ठार मारण्याची धमकी दिली होती. हा प्रकार २८ एप्रिलला दुपारी तीनच्या सुमारास घडला होता. त्यानंतर पवार यांनी जाधव याच्याविरुद्ध पोलिसात फिर्याद दिली.गुन्हा दाखल झाल्यानंतर अटकेच्या भीतीने खंडेराव जाधव याने अटकपूर्व जामीन मिळण्यासाठी न्यायालयात धाव घेतली होती. मात्र न्यायालयाने हा प्रकार गंभीर असल्याचे मत नोंदवत त्याचा अर्ज फेटाळून लावला. त्यावर जाधव याने मुंबई उच्च न्यायालयातही धाव घेतली. त्यापूर्वीच त्याच्या मागावर असणाऱ्या पोलिसांनी पहाटे आंबा येथे त्याच्या मुसक्या आवळल्या. पोलीस निरीक्षक नारायण देशमुख यांनी अटकेच्या वृत्ताला दुजोरा देताना सांगितले की, बाहेरच्या तालुक्यात कारवाई झाली आहे. याबाबत वरिष्ठ स्तरावरून यंत्रणा राबविली गेली आहे. १९९० पासून तो पोलिसांच्या रेकॉर्डवर आहे. गर्दी मारामारी, खुनाचा प्रयत्न व इतर गुन्हे त्याच्या नावावर आहेत. एका पोलीस अधिकाऱ्याची गळपट्टीही त्याने धरली होती. तसेच यापूर्वी एका मुख्याधिकाऱ्याला मारण्याची धमकी दिली होती. मात्र राजकीय पाठबळावर त्याने हा प्रकार दाबून टाकला होता.
CoronaVirus News : इस्लामपुरातील राष्ट्रवादीचा फरारी नगरसेवक खंडेराव जाधवला अटक
By ऑनलाइन लोकमत | Published: May 10, 2020 10:48 AM