लोकमत न्यूज नेटवर्क
सांगली : वाढती रहदारी, वाहनांची वाढलेली संख्या याचा विचार करून सांगलीतील स्फूर्ती चौक ते हसनी आश्रम व आलदर चौक ते स्फूर्ती चौक, हसनी आश्रम ते विजयनगर चौक या तीन रस्त्यांचे पूर्ण क्षमतेने रुंदीकरण करण्याची मागणी राष्ट्रवादीच्यावतीने जिल्हाधिकारी व जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे करण्यात आली.
निवेदनात म्हटले आहे की, तिन्ही रस्ते पूर्ण क्षमतेने रुंदीकरण, डांबरीकरण व पथदिव्यांच्या माध्यमातून सुसज्ज करावेत.
जिल्हा न्यायालय व सर्व प्रशासकीय ऑफिस यांची पार्किंग व्यवस्था ही जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील खुल्या जागेत करण्यात यावी. पादचारी उड्डाणपूल करण्यात यावा व वानलेसवाडी व विजयनगरहून सांगली--मिरज रोडला जोडला जाणाऱ्या ट्रॅफिक सिग्नलची वेळ १४ सेकंदऐवजी ३० सेकंद करण्यात यावी, अशा मागण्याही करण्यात आल्या. निवेदन देतेवेळी माजी नगरसेवक व राष्ट्रवादी काँग्रेसचे सरचिटणीस युवराज गायकवाड, युवकचे शहर जिल्हा उपाध्यक्ष आकाराम कोळेकर, अजित दुधाळ, ऋषिकेश कांबळे, श्रीधर शिरदवडे, मल्हेश राठोड, प्रज्ञा सोनटक्के उपस्थित होते.