अशोक पाटील
लोकमत न्यूज नेटवर्क
इस्लामपूर : नगरपालिका निवडणूक तयारीसाठी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी इस्लामपूर शहरातील प्रत्येक प्रभागात बैठका घेतल्या असून, आता त्यांचे पुत्र प्रतीक पाटील बूथ कमिटीची मते जाणून घेत आहेत. लवकरच शहरातील पक्षाचा ‘ग्राउंड रिपोर्ट’ जयंत पाटील यांना सादर करण्यात येणार आहे.
पालिकेच्या मागील निवडणुकीत तीस वर्षांनंतर जयंत पाटील यांच्या वर्चस्वाला पहिल्यांदाच धक्का बसला. याची सल पाटील यांच्या मनात आहे. त्यानंतर माजी नगराध्यक्ष विजयभाऊ पाटील यांच्या निधनाने राष्ट्रवादीत पोकळी निर्माण झाली. त्यांच्यानंतर शहरातील राष्ट्रवादीकडे नेतृत्व राहिलेले नाही. आता माजी नगराध्यक्ष भगवानराव पाटील व आनंदराव मलगुंडे आणि माजी उपनगराध्यक्ष बी. ए. पाटील यांच्या मार्गदर्शनाने राष्ट्रवादीचा गाडा हाकण्याचा विचार असल्याचे दिसते.
जयंत पाटील यांच्या माघारी मतदारसंघात निर्णय घेण्याची जबाबदारी त्यांचे ज्येष्ठ पुत्र प्रतीक पाटील यांच्याकडे सोपविण्यात आली आहे. इस्लामपूर, आष्टा पालिकेच्या निवडणुका तोंडावर असल्याने प्रतीक पाटील यांनी इस्लामपूर मतदारसंघात तळ ठोकला आहे. जेथे जयंत पाटील उपलब्ध नाहीत, तेथे प्रतीक पाटील यांनी उपस्थिती लावायची, असे नियोजन राजारामबापू कारखान्यावरील संपर्क कार्यालयातून होत आहे. प्रतीक पाटील बूथ कमिटीची मते जाणून घेत पक्षाचा ‘ग्राउंड रिपोर्ट’ तयार करत आहेत.
चौकट
राजकीय धडे
राजारामबापू पाटील यांनी निष्ठावान कार्यकर्त्यांची फळी तयार केली. उद्योग समूहाची उभारणी करताना त्यांनी कार्यकर्त्यालाही उभे केले. त्यांच्या पश्चात जयंत पाटील यांना ज्येष्ठ कार्यकर्त्यांनी राजकीय धडे दिले. आता जयंत पाटील यांनी प्रतीक पाटील यांना राजकीय वारसदार म्हणून मतदारसंघात सक्रिय केले आहे.