दत्ता पाटील --तासगाव तालुक्यात माजी गृहमंत्री आर. आर. पाटील यांच्या पश्चात राष्ट्रवादी बळकट असली, तरी खमक्या नेतृत्वाची पोकळी जाणवत आहे. खासदार संजयकाका पाटील यांच्यासारख्या खमक्या पारंपरिक विरोधकांशी दोन हात करण्यासाठी राष्ट्रवादीच्या शिलेदारांनी काँग्रेसचे आमदार पतंगराव कदम आणि शिवसेनेचे आमदार अनिल बाबर यांच्याशी जवळीक साधली आहे. त्यामुळे आगामी निवडणुकीत या नेत्यांकडून आणि राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांकडून कोणती भूमिका घेतली जाणार, याची उत्सुकता आहे.आर. आर. पाटील यांच्या काळात त्यांच्या शिलेदारांनी स्वत:च्या कार्यक्षेत्रात राष्ट्रवादीची भक्कम बांधणी केली होती. किंंबहुना सामान्य जनतेचे कोणतेही काम सत्तेमुळे सहजपणे होत होते. दुसऱ्या बाजूला तालुक्यातील पारंपरिक विरोधकांशी दोन हात करण्यासाठी आर. आर. आबांकडून रसद मिळत होती. मात्र आबांच्या पश्चात सुमनताई यांच्याकडे राष्ट्रवादीच्या नेतृत्वाची सूत्रे आली. मात्र तालुक्यातील राजकीय रागरंग पाहता, त्यांच्या विरोधक म्हणून काम करण्याला मर्यादा येत असल्याचे चित्र आहे. त्यामुळे आगामी राजकीय वाटचालीत खमका आधार हवा म्हणून राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी शेजारच्या विधानसभा मतदारसंघातील नेत्यांशी जवळीक वाढवल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.तासगाव तालुक्यातील मांजर्डे-विसापूर मंडलमधील २१ गावांचा खानापूर-आटपाडी विधानसभा मतदारसंघात समावेश आहे. आर. आर. पाटील यांच्या पश्चात या गावांतील राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांची शिवसेनेचे आमदार अनिल बाबर यांच्याशी सलगी वाढवली आहे. आमदार बाबरांनीही राष्ट्रवादीची सत्ता असलेल्या ग्रामपंचायतींना विकासकामांसाठी निधी उपलब्ध करून दिला आहे. काही दिवसांपूर्वी वासुंबे (ता. खानापूर) येथे राज्यमंत्री विजय शिवतारे यांच्या उपस्थितीत झालेल्या कार्यक्रमाला मांजर्डेचे जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष दिनकर पाटील यांनी हजेरी लावली होती. त्यावेळी त्यांनी आमदार बाबर यांचे जाहीर सभेत कौतुक करुन, त्यांना ताकद देण्याची मागणीही केली होती. दिनकर पाटील यांच्यासह विसापूर मंडलमधील अनेक कार्यकर्त्यांनी आमदार बाबर यांच्याशी सोयरीक केल्याचे दिसून येत आहे.दुसरीकडे दोन दिवसांपूर्वी तुरची (ता. तासगाव) येथे विविध कार्यक्रमांच्या निमित्ताने राष्ट्रवादीचे पदाधिकारी संजय पाटील आणि पंचायत समितीच्या सदस्या हर्षला पाटील यांनी काँग्रेसचे आमदार पतंगराव कदम यांना निमंत्रण दिले होते. आमदार कदम यांनीही या कार्यक्रमास हजेरी लावून ‘तुम्ही कोणत्याही अडचणीत हाक मारा, पक्ष बाजूला ठेवून मी तुमच्या मदतीला येईन’, असे सांगितले होते. यावरुनच तालुक्यातील खासदार संजयकाका पाटील यांच्यासारख्या खमक्या विरोधकाचे आव्हान पेलण्यासाठी राष्ट्रवादीच्या कारभाऱ्यांनी शेजारच्या मतदारसंघातील आमदारांशी सोयरिक साधल्याचे दिसून येत आहे.जिल्हा परिषदेची उत्सुकता फेब्रुवारी महिन्यात जिल्हा परिषदेचा रणसंग्राम होणार आहे. पतंगराव कदम यांनी तुरची येथील कार्यक्रमात आगामी निवडणुका आघाडी करुन लढण्याबाबत संकेत दिले होते. खानापूर विधानसभा मतदारसंघात तालुक्यातील मांजर्डे आणि विसापूर या दोन जिल्हा परिषद गटांचा समावेश आहे. जिल्हा परिषदेच्या निवडणुका पक्षीय पातळीवर लढवल्या जाणार आहेत, हे निश्चित आहे. यावेळी आमदार बाबर काय भूमिका घेतात, याची उत्सुकता आहे.संजयकाका विरोधात रसद भाजपचे खासदार संजयकाका पाटील यांचे आमदार पतंगराव कदम आणि आमदार अनिल बाबर यांच्याशी सुरुवातीपासूनच राजकीय सख्य नाही, तर आर. आर. पाटील यांचे कदम आणि बाबर यांच्याशी नेहमीच सलोख्याचे संबंध होते. याच संबंधांचा धागा पकडत, आबांच्या शिलेदारांनी कदम आणि बाबरांशी जवळीक साधली आहे. या दोन्ही नेत्यांकडूनही खासदारांच्या विरोधात रसद पुरवली जात असल्याचेही दिसून येत आहे.
राष्ट्रवादीला हवाय खमका आधार
By admin | Published: June 28, 2016 11:06 PM