सांगली : जिल्ह्यातील राष्ट्रवादीचे सर्व आमदार, पदाधिकारी व प्रमुख नेते राष्ट्रवादीचे प्रमुख शरद पवार यांच्यासोबत आहेत. जिल्ह्यातील राष्ट्रवादीला कुठेही बंडखोरीचा धोका नाही, असे स्पष्टीकरण जिल्हाध्यक्ष अविनाश पाटील यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत दिले.राज्यातील बंडखोरीच्या घटनेनंतर जिल्ह्यातील सर्व प्रमुख नेत्यांनी एकत्र येत सोमवारी पत्रकार परिषदेत त्यांची भूमिका मांडली. यावेळी आ. मानसिंगराव नाईक, आ. अरुण लाड, आ. सुमनताई पाटील, माजी मंत्री शिवाजीराव नाईक, अनिता सगरे, बाबासाहेब मुळीक, बाळासाहेब हाेनमोरे, मनोज शिंदे, बाळासाहेब पाटील, जिल्हा बँकेचे संचालक सुरेश पाटील, ॲड. चिमण डांगे, सुशांत देवकर आदी उपस्थित होते.अविनाश पाटील म्हणाले की, जिल्ह्यातील राष्ट्रवादी एकसंधपणे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील व पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवारांच्या मागे उभी आहे. पक्षातून नऊ आमदार फुटले ही घटना अत्यंत खेदजनक आहे. आम्ही या लोकांप्रति नाराजी व्यक्त करतो. ज्यांना राज्यात कोणीही ओळखत नव्हते अशा आमदारांना मोठी पदे देऊन पवारांनी राज्यभर ओळख करून दिले त्याच लोकांनी घात केला. ईडीच्या भीतीनेच ते सत्तेत सहभागी झाल्याचे दिसून येते. या गोष्टीने काही काळ संभ्रम निर्माण झाला होता, मात्र जिल्ह्यात एकही कार्यकर्ता आता विचलित झालेला नाही. ग्रामीण राष्ट्रवादी एकसंध व अतुट आहे.आबांनीही हाच निर्णय घेतला असतासुमनताई पाटील म्हणाल्या की, आर. आर. आबा आज जिवंत असते तर त्यांनीही शरद पवार यांचीच साथ दिली असती. त्यामुळे आम्ही त्याच भूमिकेतून पुढे जात आहोत. आमच्या कुटुंबीयांना तसेच मतदारसंघातील लोकांना त्यांनी मोठा आधार दिला. त्यामुळे आम्ही त्यांची साथ कधीच सोडणार नाही.
फारसा परिणाम नाही : नाईकमानसिंगराव नाईक म्हणाले की, ५ जुलैला होणाऱ्या पक्षाच्या राज्यस्तरीय बैठकीत निश्चित ध्येयधोरणे ठरतील. त्याची अंमलबजावणी जिल्ह्यात होईल. जिल्ह्यातील राष्ट्रवादी मजबूत असल्याने राज्यातील घटनेचा याठिकाणी फारसा परिणाम होणार नाही.