राजकारणाचा दरबार, काँग्रेसला बुडवणार; सांगली जिल्ह्यात राष्ट्रवादीचा वारू बेफाम
By ऑनलाइन लोकमत | Published: May 7, 2022 12:33 PM2022-05-07T12:33:11+5:302022-05-07T12:41:54+5:30
सतत उफाळून येणारी गटबाजी, कार्यकर्ते सांभाळताना होणारी दमछाक, निष्क्रियता आणि दरबारी राजकारण यामुळं आगामी निवडणुकांत ‘हात दाखवून अवलक्षण’ तर होणार नाही ना, असा सवाल काँग्रेसप्रेमीच विचारताना दिसतात.
श्रीनिवास नागे
राज्यातील सत्तेच्या जोरावर जिल्ह्यात राष्ट्रवादीचा वारू बेफाम सुटला असताना त्याच सत्तेतला काँग्रेस पक्ष मात्र नेहमीसारखा थंड आहे. इथं ‘वरून’ येणारे कार्यक्रम फोटोपुरते साजरे करण्यातच धन्यता मानली जाते. सतत उफाळून येणारी गटबाजी, कार्यकर्ते सांभाळताना होणारी दमछाक, निष्क्रियता आणि दरबारी राजकारण यामुळं आगामी निवडणुकांत ‘हात दाखवून अवलक्षण’ तर होणार नाही ना, असा सवाल काँग्रेसप्रेमीच विचारताना दिसतात.
जिल्हाभरात मजबूत असलेली काँग्रेस कमजोर झालीय. पलूस - कडेगाव, जत इथं पक्षाचे आमदार, पण त्यांनाही विरोधक प्रबळ. वाळवा - शिराळ्यात तर पक्ष औषधापुरता राहिलेला. खानापूर - आटपाडी, तासगाव - कवठेमहांकाळमध्ये थोडेफार कार्यकर्ते, पण तेही गटागटात विखुरलेले. तिथं कार्यकर्त्यांपेक्षा नेतेच जादा... आणि जेवढे नेते तेवढे गट! विधानसभेच्या सांगली - मिरज मतदारसंघात तेच चित्र. इथं कानामागून आलेली राष्ट्रवादी तिखट झालेली. आघाडी शाबूत राहिली तर विधानसभेला दोन्ही मतदारसंघांची तिकिटं काँग्रेस हातातून घालवणार, असे प्रत्येकाचे सवतेसुभे.
काही पक्ष निवडणुका आल्यावर जागे होतात. पण काँग्रेस तेव्हाही निष्क्रियच, हे अलीकडचं ठळक चित्र. आधीच कदम-दादा गट आणि उपगटात पक्ष विखुरलेला. त्यात नेत्यांचं दरबारी राजकारण. आपापला दरबार जपत सोयीचं राजकारण करायचं. त्यामुळं जिल्हाभरात पसरलेला काँग्रेसप्रेमी अवघ्या काही तालुक्यांपुरता उरलाय. पतंगराव कदम, मदनभाऊ पाटील यांच्या पश्चात खमक्या नेतृत्त्वाचा अभाव अधोरेखित होतोय.
चार नेत्यांच्या चार तऱ्हा
जिल्हाध्यक्ष सांगलीत मुक्कामास कधी?
- जिल्हाध्यक्षपदी निवडीनंतर आमदार विक्रम सावंत यांनी नजरेत भरण्यासारखं केलेलं काम दाखवा आणि हजार रुपये मिळवा, असे टोमणे कार्यकर्ते खासगीत मारतात. पक्षसंघटन तर दूरच.
- आमदार सावंत जतचे. तिथून सांगलीत यायचं म्हटलं की, शंभर किलोमीटरचा पल्ला पार करावा लागतो. शिवाय मतदारसंघात मित्रपक्षांचीच लुडबूड जास्त. परिणामी तिथं अडकून पडल्यानं त्यांचे सांगली दौरे दुर्मीळच. जिल्हाभरातल्या त्यांच्या दौऱ्यांचं संशोधन करावं लागेल, ही स्थिती. त्यामुळं सांगलीतले कार्यक्रम साजरे करण्याची, बैठका घेण्याची जोखीम शहर-जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील यांच्यावर.
जबाबदाऱ्याच जास्त, मग वेळ कसा काढणार?
- विश्वजित कदम यांच्यावर राज्याची म्हणजे कृषी आणि सहकार या दोन तगड्या खात्यांच्या राज्यमंत्रीपदाची जबाबदारी. त्यात पार राज्याच्या दुसऱ्या टोकाला असलेल्या भंडाऱ्याचं पालकमंत्रीपद. भारती विद्यापीठ आणि इतर सहकारी संस्थांचा कारभारही त्यांच्याकडंच.
- स्वत:च्या पलूस - कडेगाव मतदारसंघावर लक्ष ठेवावं लागतं, ते वेगळंच! त्यामुळं सांगलीसाठी वेळ काढताना त्यांची दमछाक होताना दिसते.
- पलूस - कडेगाव, जत या मतदारसंघांसोबत महापालिकेत त्यातही सांगली शहरातच त्यांचे लक्षणीय कार्यक्रम. त्यांचे चुलते आ. मोहनशेठ मुरब्बी, जुनेजाणते राजकारणी; पण वयोमान, प्रकृतीमुळं त्यांना फारसं लक्ष देता येत नाही.
कारखाना गेस्ट हाऊसमधून आता तरी सोडणार का?
वसंतदादांचे नातू तथा वसंतदादा साखर कारखान्याचे अध्यक्ष विशाल पाटील द्विधा मनस्थितीत. आमदारकी लढवायची की खासदारकी, या पेचात. राज्याचं उपाध्यक्षपद असूनही उद्योग सांभाळताना कारखान्याच्या गेस्ट हाऊसमधून बाहेर पडणं होत नाही. काँग्रेस कमिटीशेजारी घरचं कार्यालय असूनही ते तिथं कधी बसलेले नाहीत. मात्र, कार्यकर्त्यांच्या कौटुंबीक सुख-दु:खाच्या प्रसंगात त्यांची हजेरी ठरलेली. पण ती गट सांभाळण्यापुरती. ‘होय-नाही’ करण्यात वेळ गेल्यानं मागच्या लोकसभेवेळी त्यांना स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून लढावं लागलेलं. आताही त्याच कात्रीत. उलट आता सांगली लोकसभा - विधानसभा मतदारसंघांवर राष्ट्रवादीनं दावा केलेला...
गट सांभाळताना नाकीनऊ येतंय...
मदनभाऊ पाटील यांच्या पश्चात त्यांच्या पत्नी जयश्रीताई यांच्याकडं गट सांभाळण्याचा भार. जिल्हाभरातला भाऊंचा गट आता सांगली - मिरजेपुरता मर्यादित राहिलाय. त्यातही महापालिकेत या गटाची ताकद दिसणारी. पण अलीकडं काही मोहरे विश्वजित कदम यांच्याकडं तर काहीजण राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्याकडं गेलेले. आहेत त्यांना सांभाळतानाच नाकीनऊ येतंय. जयश्रीताईंना जिल्हा बँकेचं उपाध्यक्षपद मिळालंय. पण मदनभाऊंच्या हिकमती नेतृत्त्वाची उणीव कायम जाणवणारी.