सांगली : राज्यातील महाविकास आघाडीत राष्ट्रवादी, शिवसेना व काँग्रेस हे तिन्ही पक्ष एकत्र आहेत. काँग्रेस जर स्वबळावर अडून राहिली तर राष्ट्रवादी व शिवसेना एकत्रित निवडणुकीला सामोरे जाईल, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष तथा जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी रविवारी सांगलीत स्पष्ट केले.
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी स्वबळाचा नारा दिला आहे. त्याबाबत विचारता पाटील म्हणाले की, राज्यात तिन्ही पक्ष एकत्र आहेत. काँग्रेस प्रदेशाध्यक्षांनी निवडणुका स्वबळावर लढणार असल्याचे म्हटले असले तरी प्रत्यक्षात निवडणुकीला तिन्ही पक्ष एकत्रित सामोरे जातील. त्यातूनही काँग्रेस स्वबळावर अडली तर शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेस हे दोन्ही पक्ष एकत्रित निवडणुका लढतील.
नियम पाळण्यात अजितदादा आघाडीवर
पुण्यातील राष्ट्रवादीच्या कार्यक्रमाला झालेल्या गर्दीवरून भाजपने टीकेची झोड उठविली आहे. त्याबाबत जयंत पाटील म्हणाले, नवीन कार्यालयाच्या उद्घाटनाला उपमुख्यमंत्री अजित पवारांना बोलावले होते. अजितदादा येणार म्हणून लोकांनी मोठी गर्दी केली. भाषणात त्यांनी दिलगिरीही व्यक्त केली आहे. त्यांना गर्दी अपेक्षित नव्हती. सर्वांत जास्त फिजिकल डिस्टन्सिंग अजितदादाच पाळतात. त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याचा प्रश्नच येत नाही.