राष्ट्रवादीच्या नेत्यांचा खासदारांवर हल्लाबोल- सत्तेची मस्ती दाखवू नका; अन्यथा जशास तसे उत्तर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 5, 2018 11:40 PM2018-04-05T23:40:09+5:302018-04-05T23:40:09+5:30
तासगाव : दोन दिवसांपूर्वी तासगावात भाजप आणि राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये झालेली मारहाण आणि पोलिसांवर झालेल्या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर, गुरुवारी राष्ट्रवादीच्या हल्लाबोल यात्रेत
तासगाव : दोन दिवसांपूर्वी तासगावात भाजप आणि राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये झालेली मारहाण आणि पोलिसांवर झालेल्या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर, गुरुवारी राष्ट्रवादीच्या हल्लाबोल यात्रेत राष्ट्रवादीच्या नेत्यांनी भाजपचे खासदार संजयकाका पाटील यांच्यावर चांगलाच हल्लाबोल केला. माजी उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते अजित पवार, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांनी जोरदार टीका केली. सत्तेची मस्ती दाखवू नका, अन्यथा जशास तसे उत्तर देऊ, असा इशारा यावेळी दिला.
धनंजय मुंडे म्हणाले, आमच्या हल्लाबोल आंदोलनाआधीच तासगावात हल्लाबोल सुरू झाला आहे. इथे पोलीस ऐकत नाहीत, म्हणून खासदारांनी पोलिसांना मारहाण केली. सत्तेत आहात म्हणून सत्तेची मस्ती राष्टÑवादीसमोर दाखवू नका. आम्ही सुसंस्कृत आहोत. आम्हाला काही करता येत नाही, असं खासदारांनी समजू नये. उद्या अजितदादा मुख्यमंत्री झाले, तर त्यांनीही गृहखाते घ्यायला पाहिजे. त्याशिवाय ही माणसं सरळ होणार नाहीत.
ते पुढे म्हणाले, ज्या पध्दतीने सत्ता वापरताय, त्याला मर्यादा ठेवा. खासदारांच्या दादागिरीला घाबरायचे काम नाही. राष्टÑवादी त्याला चोख उत्तर द्यायला सक्षम आहे.अजित पवार म्हणाले, कायद्याचे राज्य राबवणाऱ्या आबांच्या गावात असे निंदनीय प्रकार घडतात, ही शोकांतिका आहे. आमदार, खासदार झाले म्हणून त्याला फार अक्कल आली, असे होत नाही. मिळालेल्या पदाचा वापर सामान्यांसाठी करायला हवा. चांगले काम करून जनतेचा विश्वास संपादन करण्याचे खासदार महोदयांनी काम करावे. इथे जे चालले आहे, ते सहन करणार नाही. ज्या गावच्या बोरी, त्याच गावच्या बाभळी आहेत. खोड काढण्याचा प्रयत्न केल्यास जशास तसे उत्तर देऊ, असा इशारा यावेळी पवार यांनी दिला.
ठेकेदार पोट भरायला भाजपात
जयंत पाटील म्हणाले, आम्ही विचारांचा हल्लाबोल करतो; मात्र तासगावात प्रत्यक्ष हल्लाबोल सुरू आहे. याचा पोलिसांनी विचार करायला हवा. पोलिसांनी आम्हाला सुरक्षा द्यायची असते, मात्र आम्हालाच पोलिसांना संरक्षण द्यायला लागते की काय, असे वाटत आहे. चार-दोन कार्यकर्ते ठेकेदार पोट भरायला भाजपात गेले आहेत. आम्हीही फार विचार केला नाही. तिकडे सत्ता आहे, तोपर्यंत राहू द्यात. पण सामान्य कार्यकर्ता मात्र आर. आर. पाटील यांच्या विचारांशी एकनिष्ठ आहे.