सांगली : राष्ट्रवादीअंतर्गत गटबाजीवर मंगळवारी रात्री माजी उपमुख्यमंत्री अजित पवार व पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी चर्चा केली. यावेळी कमलाकर पाटील गटाने शहर जिल्हाध्यक्ष संजय बजाज यांच्या कारभाराविषयी तक्रार मांडल्या. दोन्ही गटांचे म्हणणे ऐकून हल्लाबोल आंदोलनानंतर याविषयीचा निर्णय घेण्यात येईल, असे या नेत्यांनी स्पष्ट केले.सांगली-माधवनगर रस्त्यावरील शासकीय विश्रामगृहात रात्री अकरा ते साडे बारा या कालावधित बैठक झाली. या बैठकीत राष्ट्रवादीच्या सांगली विधानसभा क्षेत्राचे अध्यक्ष कमलाकर पाटील, माजी महापौर सुरेश पाटील, प्रा. पद्माकर जगदाळे, महापालिकेतील विरोधी पक्षनेते शेडजी मोहिते, नगरसेवक विष्णु माने, सोमनाथ सूर्यवंशी आदी उपस्थित होते. या सर्वांनी बजाज यांच्या कार्यपद्धतीवर नाराजी व्यक्त केली.
एकाचवेळी दोन महत्त्वाची पदे घेतल्यानंतरही पक्षीय कारभारात त्यांचा एकमुखी कारभार असल्याची तक्रार कमलाकर पाटील यांनी केली. ते म्हणाले स्वीकृत सदस्य पदाचा राजीनामा बजाज यांना देण्याची सूचना नेत्यांनी दिली होती, मात्र त्यांनी तो दिला नाही. या पदावर काही काळ माजी नगरसेवक हरीदास पाटील यांना संधी देण्याचे निश्चित झाले होते.
प्रत्यक्षात हरीदास पाटील यांना पदापासून वंचित ठेवण्यात आले. त्यामुळे सामान्य कार्यकर्त्यांमध्ये नाराजी आहे. आमच्या मताशी सहमत असलेले १८ नगरसेवक आहेत. त्याचबरोबर महत्त्वाचे पदाधिकारी, कार्यकर्ते यांच्याही त्याच भावना आहेत. त्यामुळे एकूण ३३ लोकांची लेखी तक्रार आम्ही प्रदेशकडे केली आहे.तातडीने पक्षाने याविषयी निर्णय घेऊन पक्षांतर्गत वातावरण चांगले ठेवण्यास मदत करावी, अशी मागणीही पाटील यांनी केली. पक्षातील कार्यकर्ते व लोकांचे खच्चीकरण करण्याचे काम गेल्या काही वर्षापासून सुरू आहे. या गोष्टी तातडीने थांबविणे गरजेचे आहे. अन्यथा महापालिका निवडणुकीत पक्षाला मोठे नुकसान सोसावे लागू शकते, असाही इशारा त्यांनी दिला.अजित पवार म्हणाले की, हल्लाबोल आंदोलनावेळी गटबाजीचा मुद्दा बाजुला ठेवावा. आंदोलने झाल्यानंतर एकदिवस येथील गटबाजीवर बैठक घेऊन त्याचठिकाणी निर्णय घेण्यात येईल. पक्षाने व नेत्यांनी घेतलेला निर्णय सर्वांनी मान्य करायला हवा. सामान्य कार्यकर्त्यांच्या भावनांचा विचारही यावेळी करण्यात येईल. विनाकारण पक्षातील वातावरण कुणी दूषित करीत असेल तर ते खपवून घेतले जाणार नाही, असेही त्यांनी यावेळी सांगितले.