कवठेमहांकाळ : युवक राष्ट्रवादीचे जिल्हा उपाध्यक्ष मोहन निवृत्ती खोत व विठुरायाचीवाडीच्या सरपंच इंदुताई निवृत्ती खोत यांच्या विठुरायाचीवाडी (ता. कवठेमहांकाळ) येथील घरांवर अज्ञातांनी दगडफेक करून, त्यांची मोटार पेटविली. हा हल्ला बुधवारी रात्री साडेअकरा वाजता करण्यात आला. या हल्ल्याची नोंद कवठेमहांकाळ पोलिसांत झाली असून, अज्ञातांविरोधात गुन्हा नोंद करण्यात आला. या हल्ल्याच्या घटनेने तालुक्यात खळबळ माजली आहे.राष्ट्रवादीच्यावतीने गुरुवारी या घटनेचा निषेध नोंदवण्यात आला या प्रकरणाची सखोल चौकशी करून तत्काळ आरोपींना अटक करावी, अशी मागणीही करण्यात आली. कवठेमहांकाळ पोलिसांना तसे निवेदन देण्यात आले.तालुक्यातील विठुरायाचीवाडी येथील खोत मळ्यात युवक राष्ट्रवादीचे जिल्हा उपाध्यक्ष मोहन खोत व त्यांच्या आई सरपंच इंदुताई खोत यांचे घर आहे. ग्रामपंचायतीवर खोत यांचीच सत्ता आहे. बुधवारी रात्री खोत कुटुंबीय झोपले असता साडेअकरा वाजता अज्ञात हल्लेखोर खोत मळ्यात आले. त्यांनी खोत यांच्या घराच्या दारांना बाहेरून कड्या लावून घरावर दगडफेक केली. घरासमोर लावलेली मोटार (एमएच १0 बीएच ६२२४) पेट्रोल ओतून जाळण्यात आली. त्यानंतर हल्लेखोरांनी पलायन केले.यामध्ये खोत कुटुंबाचे दोन ते तीन लाखाचे नुकसान झाले आहे. या हल्ल्यामुळे खोत कुटुंबीय भीतीच्या छायेखाली वावरत आहेत. गावात तणावपूर्ण शांतता आहे. कवठेमहांकाळ पोलिसांनी पंचनामा केला असून अज्ञातांविरोधात गुन्हा नोंद केला आहे. ही घटना सोशल मीडियावरून वाऱ्यासारखी सर्वत्र पसरली. यामुळे गुरुवारी सकाळी राष्ट्रवादीचे नेते, कार्यकर्त्यांनी कवठेमहांकाळ येथे या हल्ल्याचा निषेध नोंदविला. महांकाली साखर कारखान्याचे अध्यक्ष विजय सगरे, युवक राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष ताजुद्दीन तांबोळी, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष नारायण पवार यांच्या नेतृत्वाखाली कवठेमहांकाळचे सहाय्यक पोलिस निरीक्षक सचिन निकम यांना निवेदन देण्यात आले. या हल्ल्याची सखोल चौकशी करण्यात यावी व आरोपींना तात्काळ अटक करावी, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. यावेळी युवक राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष गणेश पाटील, चंद्रशेखर सगरे, मन्सूर मुलाणी, श्रीकांत बजबळे, हणमंत शिंदे, दरिकांत दोडमिसे, गणेश कारंडे, दीपक स्वामी, तानाजी खोत, अभिजित घुणके, संदीप खोत उपस्थित होते. (वार्ताहर)घरावरील हल्ला राजकीय विरोधातून आमच्या घरावरील हल्ला राजकीय विरोधातून केला असल्याचे सरपंच इंदुताई खोत व मोहन खोत यांनी सांगितले, मात्र त्यांनी संशयितांची नावे सांगण्यास असमर्थता दर्शवली.
राष्ट्रवादी पदाधिकाऱ्याच्या घरावर हल्ला
By admin | Published: August 05, 2016 1:49 AM