कोरोनामुळे बंद असलेली जिल्ह्याची बाजारपेठ व व्यापार लवकर सुरू व्हावा, ही आमचीही भूमिका आहे. त्यासाठी पालकमंत्री जयंत पाटील यांच्याकडे पाठपुरावा सुरू आहे. आ. खाडे यांनी व्यापाऱ्यांना पाठिंबा द्यावा, आंदोलने करावीत; मात्र लोकांची माथी भडकावून सुरू असणारे राजकारण आम्ही सहन करणार नाही, असेही होनमोरे यांनी म्हटले आहे.
ते म्हणाले, स्वत:चा नाकर्तेपणा लपविण्यासाठी व्यापाऱ्यांचा वापर करू नये. कोरोना साथीदरम्यान गेल्या दोन वर्षांत मिरजकरांना आपण काय दिलासा दिला, याचा हिशोब त्यांनी द्यावा, अशी मागणी होनमोरे यांनी केली. २००९ मध्ये घडलेल्या दंगलीचे मिरजकरांना दुःख आहे. दंगलीच्या वेदना कायम आहेत. केवळ राजकीय स्वार्थासाठी माथी भडकवण्याचा, व्देषाची भावना जागवण्याचा प्रयत्न सुरू आहे. मात्र मतांच्या राजकारणासाठी आ. खाडे पुन्हा जुन्या जखमांवरील खपली काढत आहेत. अशा वृत्तींना ओळखून वेळ आल्यानंतर मिरजकर त्यांना धडा शिकवतील, असेही बाळासाहेब होनमोरे यांनी निवेदनात म्हटले आहे.