इस्लामपूर : शहराचा विकास हाच आमचा अजेंडा आहे. येत्या पाच वर्षांत आम्ही तो पूर्ण करणारच. त्यामुळे राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी पुराव्याशिवाय बोलून शहराच्या विकासकामात अडथळा आणण्याचा प्रयत्न केल्यास विकास आघाडी व शिवसेनेचे कार्यकर्ते ते सहन करणार नाहीत, असा इशारा देत नगराध्यक्ष निशिकांत भोसले-पाटील यांनी शहरातील विकासकामांची पाहणी करण्याकरिता विद्यमान आमदारांच्या तारीख व वेळेची वाट पाहत आहोत, असा टोला मारला.
येथील नगराध्यक्ष दालनात झालेल्या पत्रकार बैठकीत त्यांनी शासनाकडून नगरपालिकेला विविध योजनांतून प्रशासकीय मान्यतेसह मंजूर झालेल्या १२ कोटी ३४ लाख रुपयांच्या सर्व १४ प्रभागांतील विकासकामांची लेखी प्रतच पत्रकारांना सादर केली. पाटील म्हणाले, गेल्या १४ महिन्यांच्या काळात पालिकेला प्रशासकीय मान्यतेसह निधी मिळाला आहे. फेबु्रवारीपासून लोकशाहीर आण्णा भाऊ साठे नागरी दलित वस्ती योजनेतून २ कोटी ३१ लाख, नागरी दलितेत्तर वस्ती सुधारणा योजनेतून ६७ लाख ६३ हजार, विशेष रस्ता अनुदान ५ कोटी, १४ व्या वित्त आयोगातून २३ लाख ५९ हजार, महाराष्ट्र नगरोत्थान महायोजनेतून १ कोटी ३६ लाख तर वैशिष्ट्यपूर्ण योजनेतून २ कोटी रुपयांचा निधी प्राप्त झाला आहे.नगराध्यक्ष पाटील म्हणाले, कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत, आघाडीचे नेते विक्रम पाटील, शिवसेनेचे आनंदराव पवार या सर्वांच्या पाठपुराव्यातून शहरातील विकासकामात सातत्य राहणार आहे. निनाईनगरातील भुयारी गटर योजनेचा पहिला टप्पा संपत आला आहे. तेथील रस्त्याचे काम सुरू करणार आहोत. क्रांतिसिंह नाना पाटील नगरातही भुयारी गटार, रस्ते, वीज, पाणी ही कामे होतील. शहरातील वाहतूक व्यवस्थेसाठी सिग्नल यंत्रणा आणि सी.सी.टी.व्ही. कॅमेरे येत्या ६ महिन्यांत बसविण्याचा प्रयत्न आहे.यावेळी आनंदराव पवार, वैभव पवार, मंगल शिंगण, अजित पाटील, सुभाष शिंगण, गजानन फल्ले उपस्थित होते.कायद्याचा अभ्यास करा, मग बोला...वैशिष्ट्यपूर्ण योजनेतील निधी भुयारी गटार योजनेकडे वळविल्याचा विरोधकांचा आरोप चुकीच्या माहितीवर आधारित आहे. सर्वसाधारण सभेत २ कोटी रुपयांच्या खर्चाच्या नियोजनाचा ठराव झाला आहे. उपनगराध्यक्ष दादासाहेब पाटील यांनी अनुमोदन दिले आहे. मात्र, तरीही त्यांच्याकडून अशा पध्दतीचे वक्तव्य होणे दुर्दैवी आहे. संकलित कराबाबत काही नगरसेवकांनी आरोप केले. पण, ही बाब प्रशासकीय आहे. त्यामध्ये नगराध्यक्ष किंवा नगरसेवकांचा संबंध नसतो. मुख्याधिकारी कायद्यानुसार आपले काम बजावत आहेत. कायद्यातील सुधारणा आणि दुरुस्तीचा अभ्यास राष्ट्रवादीच्या नगरसेवकांनी करावा, असा टोला पाटील यांनी लगावला.