सांगली : सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीसाठी राष्ट्रवादी, भाजप व मदन पाटील गटाच्या पॅनेलची २२ रोजी सकाळी, तर काँग्रेस, जनसुराज्य पक्ष युतीच्या पॅनेलची घोषणा २० जुलैरोजी करण्यात येणार असल्याची माहिती दोन्ही पक्षांच्या जिल्हाध्यक्षांनी मंगळवारी दिली. येत्या शनिवारी व रविवारी दोन्ही पक्षांचे उमेदवार निश्चित करण्यात येणार आहेत. यासाठी संबंधित तालुका नेत्यांची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे. सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीसाठी सध्या ५०४ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. इच्छुकांची संख्या वाढल्याने चर्चेसाठी वेळ लागत आहे. त्यातच तासगाव, विटा, पलूस आदी बाजार समितींच्या निवडणुकीत नेतेमंडळी गुंतल्याने सांगलीकडे सध्या दुर्लक्ष झाले आहे. राष्ट्रवादी, भाजप, मदन पाटील गटाकडील इच्छुकांच्या मुलाखती पूर्ण झाल्या आहेत. राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष विलासराव शिंदे म्हणाले की, इच्छुकांशी प्राथमिक स्वरूपात चर्चा झालेली आहे. राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील येत्या शनिवारी व रविवारी सांगलीमध्ये थांबणार आहेत. यावेळी ते उमेदवार निश्चित करणार आहेत. उमेदवार निवडीचे सर्व अधिकार त्यांना देण्यात आले आहेत. इतर पक्षांचे उमेदवार त्यांचे नेते निश्चित करणार आहेत. आमच्या युतीचे पॅनेल मात्र अर्ज माघारीच्या शेवटच्यादिवशी म्हणजे २२ जुलैरोजी सकाळी जाहीर करण्यात येणार आहे. युतीचे जागावाटप झाले आहे. पॅनेलची अघिकृत घोषणा मात्र २२ जुलैरोजी सकाळी करून इतरांना अर्ज मागे घेण्यास सांगण्यात येणार आहे. काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष मोहनराव कदम म्हणाले की, बुधवारपासून (दि. १५) काँग्रेसमधील इच्छुकांच्या मुलाखती पूर्ण करण्यात येतील. २० जुलैरोजी पॅनेल जाहीर करण्यात येईल. उमेदवार निवडीचे अधिकार त्या-त्या तालुक्यांतील नेतेमंडळी व अध्यक्षांना देण्यात आले आहेत. त्यांच्या तालुक्यातील उमेदवार तेच जाहीर करतील. त्यानंतर अंतिम पॅनेल जाहीर करण्यात येईल. बंडखोरीला थारा दिला जाणार नाही. एकमताने ही निवडणूक लढविण्यात येईल. (प्रतिनिधी)बाजार समिती अर्ज अवैधप्रश्नी शुक्रवारी सुनावणीसांगली : बाजार समितीच्या निवडणुकीत अर्ज अवैध ठरलेल्यांच्या अपिलावरील सुनावणी जिल्हाधिकारी शेखर गायकवाड यांच्यासमोर शुक्रवारी होणार आहे. दरम्यान, आनंदा लालासाहेब पाटील यांनीही अर्ज अवैध ठरल्याप्रकरणी त्यांनी मंगळवारी अपील केले. यामुळे निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या निकालावर अपील करणाऱ्यांची संख्या आता सात झाली आहे.निवडणुकीसाठी अर्ज केलेल्या तीसजणांचे उमेदवारी अर्ज निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी अवैध ठरवले. या निर्णयाविरोधात अपील केले आहे. यामध्ये पांडुरंग यमगर, सिध्दाप्पा सिरसट, संभाजी पवार, रामचंद्र पाटील, आनंदा पाटील आदींचा समावेश आहे. तिसऱ्या आघाडीसाठी आज मुलाखतीया निवडणुकीमध्ये तिसरी आघाडी उतरणार असून, इच्छुकांच्या बुधवारी सांगलीत मुलाखती होणार असल्याची माहिती शिवसेना नेते पृथ्वीराज पवार यांनी दिली. माजी आमदार शरद पाटील, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष व शिवसेना नेते या मुलाखती घेणार आहेत. अंतिम निर्णय मात्र आणखी चार दिवसांनी घेण्यात येणार आहे. खा. राजू शेट्टी या निवडणुकीसाठी वेळ देणार आहेत.
राष्ट्रवादीचे २२ ला, तर काँग्रेसचे सोमवारी पॅनेल
By admin | Published: July 14, 2015 11:17 PM