सांगली : महापालिकेच्या प्रभाग १६ मधील पोटनिवडणुकीच्या प्रचारावरून शुक्रवारी राष्ट्रवादी व शिवसेनेत जुंपली. आघाडी धर्माची आठवून करून देत शिवसैनिकांनी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष, पालकमंत्री जयंत पाटील यांना शिवसेना उमेदवारांना पाठिंबा देण्याची गळ घातली. पण, जयंतरावांनी ही मागणी टोलवत काँग्रेससोबतच राहणार असल्याचे स्पष्ट केले.
पोटनिवडणुकीत काँग्रेसचे उमेदवार तौफिक शिकलगार यांच्या प्रचारासाठी जयंत पाटीलसांगलीत आले होते. यावेळी शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख शंभूराज काटकर, युवा सेनेचे रणजीत जाधव यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्त्यांनी पाटील यांची भेट घेतली. महाराष्ट्रात तीन पक्षांची सत्ता आहे. काँग्रेसने कोणालाही विश्वासात न घेता उमेदवार दिला. राष्ट्रवादीला काँग्रेससोबतच शिवसेनाही जवळची आहे. त्यामुळे राष्ट्रवादीने शिवसेनेच्या उमेदवाराचा प्रचार करावा, अशी मागणी शिवसैनिकांनी केली.
पण, जयंतरावांनी ही मागणी फेटाळत शिवसैनिकांनाच कानपिचक्या दिल्या. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांची दूरध्वनीवरून चर्चा झाल्यानंतर राष्ट्रवादीने माघार घेत काँग्रेसला पाठिंबा दिला आहे. शिवसेनेचे नेते अनिल देसाई यांच्याबरोबरही काँग्रेसने चर्चा केली होती. मात्र, तुम्ही या ठिकाणी अर्ज दाखल केला. आम्ही काँग्रेससोबतच राहणार असल्याचे स्पष्ट केले.
यावेळी उपशहर प्रमुख संदीप पाटील, रोहन वाल्मिकी, बटू परदेशी, अनिकेत कराळे, सारंग पवार, सुशांत साखळकर, आकाश कराळे, नईम शेख आदी उपस्थित होते.