इस्लामपूर : एका बाजूला कोरोनाचे संकट आणि दुसऱ्या बाजूला इंधनाची प्रचंड दरवाढ आणि वाढत्या महागाईने बेजार झालेल्या महिलांनी वाळवा तालुका महिला राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेतृत्वाखाली आपापल्या दारात महागाईविरोधी आंदोलन केले. दारात मोकळ्या गॅस सिलिंडरला पुष्पहार घालून, ‘जनता महागाईने त्रस्त, तर पंतप्रधान महाल बांधण्यात व्यस्त’, ‘मोदी हैं, तो महंगाई हैं’ अशा पाट्या हातात घेत आंदोलन केले.
महिला राष्ट्रवादीच्या पश्चिम महाराष्ट्र सचिव छाया पाटील यांनी कामेरी, वाळवा तालुकाध्यक्षा सुस्मिता जाधव यांनी नरसिंहपूर, राजारामबापू साखर कारखान्याच्या संचालिका मेघा पाटील यांनी शिगाव, तर तालुका उपाध्यक्षा वैशाली पाटील यांनी बहे गावात पाच सहकारी महिलांना सोबत घेऊन आंदोलन केले.
तालुकाध्यक्ष जाधव म्हणाल्या, केंद्र शासनाने गाजावाजा करीत उज्ज्वला गॅस योजना आणली. मात्र, त्यांनी दिलेले गॅस सिलिंडर आणि शेगड्या धूळखात पडल्या आहेत. केंद्र शासनाने तातडीने गॅस, पेट्रोल, डिझेल दरवाढ कमी करून महागाई कमी करावी.
फोटो ओळी-
नरसिंहपूर येथे महागाईविरोधी आंदोलन करताना महिला राष्ट्रवादीच्या तालुकाध्यक्षा सुस्मिता जाधव व पक्ष कार्यकर्त्या.