अशोक डोंबाळे, सांगली : जिल्हा परिषद सभापती निवडीत विधानसभा निवडणुकीतील राजकीय गणित मांडून राष्ट्रवादीच्या नेत्यांनी आटपाडी तालुक्यात अमरसिंह देशमुख आणि तानाजी पाटील या दोघांनाही खूश केले आहे. देशमुख आणि पाटील गटात अध्यक्षपदावरून धुसफूस सुरु असल्यामुळे विधानसभा निवडणुकीत ते एकसंध राहणार का, असा सवाल उपस्थित होत आहे. तासगावला सव्वा वर्षात अध्यक्ष व एक सभापतीपद देण्याचे आश्वासन देऊन नाराजांची समजूत काढण्यात आली आहे.आटपाडी तालुक्यातील राष्ट्रवादीचे नेते तानाजी पाटील यांनी पत्नी मनीषा यांना अध्यक्षपद मिळविण्यासाठी प्रयत्न केले, पण देशमुखांच्या अडथळ्यातून ते पदरात पाडून घेणे अशक्य झाले. देशमुख आणि पाटील वाद उफाळून आल्यामुळे अध्यक्षपदाला ‘खो’ बसला. राष्ट्रवादीचे नेते माजी गृहमंत्री आर. आर. पाटील आणि माजी ग्रामविकासमंत्री जयंत पाटील यांना देशमुख आणि पाटील या दोघांपैकी एकालाही दुखवून चालणार नव्हते. यातूनच देशमुख आणि पाटील गटाला सभापतीपद देण्याचा निर्णय झाला. दोघांच्या भांडणात आटपाडी तालुक्याचा फायदा झाला आहे. मनीषा पाटील आणि उज्ज्वला लांडगे यांना सभापतीपदाची संधी मिळाली आहे. मात्र यातून देशमुख-पाटील वाद पुन्हा चव्हाट्यावर आल्यामुळे, त्याचे पडसाद विधानसभा निवडणुकीत उमटणार आहेत.नेत्यांनी झुकते माप देऊन आटपाडीला खूश केले, पण तासगाव तालुक्यातील पाच महिला सदस्या असताना त्यांना अडीच वर्षात एकदाही संधी मिळालेली नाही. पहिली सव्वा वर्षे छायाताई खरमाटेंना संधी मिळाली. पण, त्यानंतरच्या सव्वा वर्षात आणि सध्याच्या पदाधिकारी बदलात डावलल्यामुळे येथील सदस्या नाराज आहेत. माजी गृहमंत्री पाटील यांनी आगामी सव्वा वर्षात तासगावला अध्यक्ष आणि एक सभापतीपद देण्यात येणार असल्याचे सांगून सदस्यांची समजूत काढली. आर. आर. पाटील यांनी कवठेमहांकाळ तालुक्यातील गजानन कोठावळे यांची सभापतीपदी वर्णी लावली. कवठेमहांकाळमध्ये त्यांनी बेरजेचे राजकारण केले, तर जयंत पाटील यांनी पपाली कचरे यांना संधी देऊन इस्लामपूर विधानसभा मतदारसंघात जुळवाजुळव केली आहे.