सांगली : राजारामबापू तंत्रशिक्षण संस्थेच्या वसंत कॉलनीतील इमारतीत राष्ट्रवादीच्या नेते, कार्यकर्त्यांचा राबता वाढल्याने पक्षाचे जिल्हा परिषदेसमोरील जिल्हा कार्यालय धूळखात पडले आहे. आरआयटीच्या इमारतीलाच आता राष्ट्रवादीचे कार्यालय म्हणून संबोधले जात असून त्याठिकाणीच पक्षाच्या बैठका, कार्यक्रम, सत्कार सोहळे होत आहेत.
राष्ट्रवादीच्या स्थापनेनंतर मदन पाटील यांनी पक्षाचे जिल्हा कार्यालय उभारण्यासाठी पुढाकार घेतला. जलसंपदामंत्री जयंत पाटील व दिवंगत नेते आर. आर. पाटील यांनाही ही जागा आवडली. जिल्हा परिषदेच्या समोरच कार्यालय असल्याने ही जागा घेण्याचे नियोजन झाले. पक्षाच्या नावावर जागा खरेदी करण्यात आली. महापालिका क्षेत्रासह जिल्हा कार्यकारिणीच्या बैठकाही याठिकाणी होत होत्या. अनेक निवडणुकांचे साक्षीदार असलेले हे कार्यालय आता इतिहासाच्या पाऊलखुणा जपत धूळ खात पडले आहे.
वसंत कॉलनीत जयंत पाटील यांच्या तंत्रशिक्षण संस्थेच्या जागेत आता पक्षीय बैठका, कार्यक्रम होऊ लागले आहेत. जयंत पाटील यांच्यासह जिल्हाध्यक्ष व अन्य पदाधिकारीही याचठिकाणी बैठका घेतात. त्यामुळे जिल्हा कार्यालय ओस पडले आहे. जिल्हाध्यक्ष, शहर जिल्हाध्यक्ष, सचिव यांचे केबिन्स्, मिटिंग हॉल यांना आता कार्यकर्त्यांची प्रतीक्षा करावी लागते. केवळ फलकापुंरते अस्तित्व उरले असून वसंत कॉलनीतील इमारतीलाही राष्ट्रवादी कार्यालयाचा फलक लावला आहे. जयंत पाटील यांचा आता पक्षात एकछत्री अंमल असल्यामुळे त्यांच्याच संस्थेची सांगलीतील इमारत पक्षीय राजकारणाचे केंद्र बनली आहे. यापूर्वी कोणत्याही निवडणुकीतील विजयाचा गुलाल राष्ट्रवादीच्या जुन्या कार्यालयाला लागत होता, आता तो नव्या इमारतीला लागत आहे.
चौकट
वसंत कॉलनी पुन्हा केंद्रस्थानी
गेली कित्येक वर्षे मदन पाटील यांच्या माध्यमातून सांगलीतील वसंत कॉलनी राजकीय हालचालींच्या केंद्रस्थानी होती. त्यांच्या निधनानंतर वसंत कॉलनीतील राजकीय हालचाली शांत झाल्या. आता याच कॉलनीतील जयंत पाटील यांच्या संस्थेत राष्ट्रवादीचे कार्यालय सुरू झाल्याने ही कॉलनी पुन्हा राजकीय हालचालींचा केंद्रबिंदू बनली आहे. काँग्रेस नेत्या जयश्रीताई पाटील, शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील यांचीही घरे याच कॉलनीत असल्याने काँग्रेसच्या कार्यकर्त्यांचा येथे राबता असतो.